शासन निर्णयाविरोधात अंगणवाडी सेविकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:15 IST2018-02-21T00:14:17+5:302018-02-21T00:15:01+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

शासन निर्णयाविरोधात अंगणवाडी सेविकांचे धरणे
ऑनलाईन लोकमत
वर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयामुळे अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, कमी विद्यार्थी असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाºयांना समाधानकारक मानधन देण्यात यावे, थकीत आहाराचे देयके तात्काळ देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत असलेला प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या होत्या. धरणे आंदोनादरम्यान काही अंगणवाडी सेविकांनी मनोगत व्यक्त करताना त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मांडून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.
आंदोलनादम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले.
आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजया पावडे, जिल्हा संघटक असलम पठाण, मंगला इंगोले, सरचिटणीस वंदना कोळणकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, सुनंदा आखाडे, शोभा सायंकार, रेखा काचोळे, शोभा तिवारी, नलिनी चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.