उपसा सिंचन योजनेने वाढविली अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:13 IST2019-05-13T22:13:20+5:302019-05-13T22:13:50+5:30
आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.

उपसा सिंचन योजनेने वाढविली अडचण
फनिंद्र रघाटाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.
सिंचनाची भरीव सोय व्हावी म्हणून शासनाने आर्वी उपसा सिंचन योजना लोअर वर्धा प्र्रकल्पाच्या बॅक वाटर वर सुरू केली आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार या योजनेवर २५० कोटी पेक्षा अधिक खर्च होणार आहे. मागील वर्षी सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले. तर यावर्षी वॉटर टँक आणि जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प नियोजीत वेळेत पूर्ण झाल्यास खर्चाचे बजेट वाढणार नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली; पण सध्या कामाचा वेग मंदावला आहे. शिवाय मलातपूर शेतशिवारात अनेकांच्या शेतात कंत्राटदाराने मोठाले पाईप टाकून ठेवले आहे. हे पाईप खोलवर खड्डा करून त्यात वेळीच पुरविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कंत्राटदाराने तातडीने सदर पाईप जमिनीत पुरवावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांची आहे.
सदर योजनेचे काम झटपट पूर्णत्वास गेल्यास याचा फायदा शेतकºयांनाच होणार आहे. हे जरी खरे असले तरी मागील काही दिवसांपासून शेतात मोठमोठे पाईप पडून आहेत. त्यामुळे उन्हाळवाहीची कामे कशी करावी, असा प्रश्न भेडसावत आहे.
- नरेश वानरे, शेतकरी, मलातपूर.