नेत्यांचे मनोमिलन ठरतेय कार्यकर्त्यांसाठी अडचणीचे
By Admin | Updated: July 2, 2015 02:33 IST2015-07-02T02:33:53+5:302015-07-02T02:33:53+5:30
तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांचे मनोमिलन होत आहेत.

नेत्यांचे मनोमिलन ठरतेय कार्यकर्त्यांसाठी अडचणीचे
कृउबास निवडणूक : ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांत कटुता कायमच
घोराड : तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांचे मनोमिलन होत आहेत. हा प्रकार कार्यकर्त्यांना अडचणीत टाकणारा ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार प्रमुख पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध लढले तर एका पक्षात बंडेखारीही झाली. यावेळी गावखेड्यातील कार्यकर्ते विखुरले गेले. तालुक्यातील काँग्रेसचे परंपरागत असलेले दोन गट एकत्र आले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांत दोन गट पडले होते. बाजार समितीची निवडणूक तालुक्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. त्यातच सहकारी संस्था गटात सर्वाधिक उमेदवार असून विविध सहकारी संस्थेवर देशमुख गटाचे वर्चस्व आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर जयस्वाल, शेंडे, रणनवरे गटाचे वर्चस्व आहे. यातच काही ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आहेत. काही महिन्यांपूर्वी एकमेकांविरूद्ध असणारे नेते एकत्र येत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्यास संभ्रमात वाढ झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विरोध दूर सारुन नेते एकत्र आले. यामुळे या तीनही नेत्यांचे मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपाचा मित्र शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या मनोमिलनामुळे एकत्रितरित्या उमेदवार उभे केले जात आहे. यात सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारापासून दूर राहावे लागत असल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसतो.
निवडणुकीपुरते हे मनोमिलन असले तरी निवडणूक निकालातूनच हे प्रकट होणार असल्याची खमंग चर्चा आहे. ग्रामपंचायत गटामध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणते स्थानिक नेते कुणाच्या युतीत राहतील, हे स्पष्ट होणार आहे.
तुर्तास निवडणूक दूर असली तरी कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे. नेत्याचे मनोमिलन होत असून कार्यकर्त्यांत असलेली कटुता अद्याप कायम आहे. यामुळे हे कार्यकर्ते एकत्र येतील काय, असा सवालही उपस्थित होत आहे.(वार्ताहर)