समृद्धी महामार्गाच्या कामाने वाढविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:19 PM2020-10-13T16:19:44+5:302020-10-13T16:23:08+5:30

Wardha News Agriculture नागपूर-मुंबई महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.

Problems of farmers exacerbated by Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाच्या कामाने वाढविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

समृद्धी महामार्गाच्या कामाने वाढविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

Next
ठळक मुद्दे अफकॉन कंपनीच्या मनमर्जी कारभाराचा पिकांना फटकागौण खनिजाचे उत्खनन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-मुंबई महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कपंनीच्या माध्यमातून केले जात असून कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यातील ५७९. ४६४ हेक्टरमधून समृद्धी महामार्ग जात असून याकरिता जमिनी संपदित केल्या आहेत. या महामार्गाचा कंत्राट असलेल्या अफकॉन्स कंपनीने सुरुवातीपासून अवैध उत्खननासह अवैध वाहतूक सुरू केल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अफकॉन्स कंपनीविरुद्ध अवैध उत्खननप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तरीही कंपनीच्या कामकाजात सुधारणा झालेली नसल्याने महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आर्वी तालुक्यातील सोरटा-विरूळ भागात महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यावरुन दिवसरात्र जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची वाट लागली असून उडणाऱ्या धुळीने पिकांचेही नुकसान होत असल्याने विरूळ, सोरटा, रसुलाबाद, पिंपळगाव, निजामपूर, टाकळी, मारडा, सालफळ तर वर्धा तालुक्यातील पिपरी, गणेशपूर, पांढरकवडा या गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच निसर्गकोपाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अ‍ॅफकॉन्सच्या कामाने आणखीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अ‍ॅफकॉन्सच्या मनमर्जी कामाला ब्रेक लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पोलीस, महसूल विभागाचीही साथ
समृद्धी महामार्गाकरिता होणारी अवजड वाहतूक शेतकऱ्यांसह गावकऱ्यांकरिता धोक्याची ठरत आहे. दिवसरात्र होणाऱ्या या वाहतुकीने मोठे नुकसान होत असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांकडे किंवा महसूल विभागाकडे तक्रार केली तर कारवाई न करता शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीचा मनमर्जी कारभार सुरू असून शेतकऱ्यांची वाट लावली जात असल्याचा आरोप होत आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी संरक्षण भिंतीचे काम रोखले
आर्वी तालुक्यातील पिंपळगाव, विरुळ, निजामपूर, टाकळी, रसुलाबाद येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाकरिता संपादित करण्यात आल्या असून काहींचे संपादन शिल्लक राहिले आहे. असे असताना समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केल्यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हे बांधकाम रोखले असून जमिनीचे तत्काळ संपादन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Problems of farmers exacerbated by Samrudhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.