साथीच्या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय
By Admin | Updated: July 11, 2016 02:02 IST2016-07-11T02:02:08+5:302016-07-11T02:02:08+5:30
पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे.

साथीच्या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय
यशवंत महाविद्यालयात जनजागृती : वैद्यकीय जनजागृती मंचाच्या शाळा जागर मोहिमेस प्रारंभ
वर्धा : पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली. साचलेल्या पाण्याचे डबके, घराच्या छतावरील अस्वच्छता कुलरच्या टाक्या कायम ठेवणे, पिण्याच्या व वापराच्या पाण्याच्या टाक्यांतील अस्वच्छता, भांडी कोरडी न करणे आदींमुळे साथीचे आजार पसरविणऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढला. हे आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच मार्ग आहे, असे मत डॉ. सचिन पावडे यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे पावसाळ्यातील आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी सेलू येथील यशवंत महाविद्यालयातून करण्यात आला. यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबाबत सजगतेचा इशारा देत प्रतिबंधात्मक उपायही डॉ. पावडे यांनी सूचविले. याप्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धमाने, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रदीप सुने, डॉ. प्रशांत वाडिभस्मे, डॉ. आनंद गाढवकर, डॉ. राजेश सरोदे, डॉ. प्रवीण सातपुते उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आरोग्य जपण्याचा मंत्र दिला. यावेळी प्राचार्य रंजना दाते उपस्थित होत्या.
पावसाळ्यात पाणी खराब होणे, दूषित होणे, असे प्रकार घडतात. परिणामी, डायरिया, टायफाईड, कावीळ असे आजार संभवतात. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केल्यास फारच उत्तम. त्यातही पिण्याचे पाणी वापरताना उकळून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. वापराच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून पांढरा चुना मारणे, त्यात गप्पी मासे पाळणे हे उपाय आहेत. हे मासे मच्छरादी फस्त करून पाणी स्वच्छ ठेवतात.
विविध साथीच्या आजाराची उत्पत्ती ज्या डासांपासून होते, असे डास स्वच्छ पाणी व साचलेल्या पाण्यात वाढतात. छतावर टाकाऊ वस्तू जसे डब्बे, टायर, नारळाचे रिकामे डोल आदी पडून असल्यास तेथे डासांची उत्पत्ती होते. सोबतच अनेकांनी अद्याप कुलर काढून ठेवले नाही. कुलरच्या टाकीमध्ये हमखास डासांची उत्पत्ती होते. या डासांच्या दंशातून साथीच्या आजाराची लागण होते. परिसरातील पाणी साचलेले खड्डे धोकादायक ठरतात. या खड्ड्यांत थोडेसे क्रुड आॅईल, रॉकेल टाकल्यास डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते. याबाबत नागरिकांनी सक्रीयता दाखविणे गरजेचे आहे. डासांमुळे डेग्यू, मलेरिया, तर दूषित, खराब पाण्यामुळे डायरिया, टायफाईड, कावीळ असे आजार उद्भवतात. यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असेही सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)