राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:33 IST2018-09-30T23:32:36+5:302018-09-30T23:33:31+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे.

राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी नागरिकांना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. खा. राहूल गांधी यांच्या जाहीर सभेसाठी सध्या रामनगर भागातील सर्कस मैदान सज्ज होत आहे. नियोजित कामे सध्या युद्धपातळीवर केले जात असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून योग्य उपाययोजनाही केल्या जात आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सर्कस मैदान येथे पार पडणाऱ्या जाहीर सभेला सुमारे ४० हजाराच्यावर नागरिक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. या जाहीर सभेच्यापूर्वी स्थानिक सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ‘गांधी संदेश यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचणार आहे. ही पदयात्रा वर्धा शहारातील ज्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळती करण्यात येणार आहे. कुठल्या कुठल्या मार्गावरील वाहतूक किती वेळेकरिता इतर मार्गाने वळती करण्यात येईल यासाठीच्या नियोजनाला अंतीम स्वरूप सध्या वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी देत आहेत. तर ज्या ठिकाणी खा. राहूल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे त्या सर्कस मैदानावर सध्या तात्पूर्वी पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मैदानावर होत असलेल्या प्रत्यक गोष्ठींवर लक्ष ठेवून आहेत. सभा स्थळी ४८ बाय ६४ फुट मोठे असे भव्य व्यासपीठ उभारले जात असून सर्कस मैदानात सभा ऐकण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या पुढाºयांना बसण्यासाठी व्यासपीठाच्या पुढील बाजूला वेगळी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. सर्कस मैदानातील जाहीर सभेचा व्यासपीठ तयार करणे व तेथील बैठक व्यवस्थेची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील एका मंडप-डेकोरेशन व्यावसायिकाला देण्यात आली आहे. सुमारे ५० व्यक्ती सध्या रात्र-दिवस युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत.
सभास्थळी ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी देणार खडा पहारा
स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथील खा. राहूल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. जाहीर सभेच्या सुरक्षेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याच्या खांद्यावर टाकण्यात आली असून २ आॅक्टोबरला सर्कस मैदानाला बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. सुमारे ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्कस मैदान परिसरात खडा पहाराच देणार आहेत. यात १०० महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग राहणार आहे.
मोठ्या जनरेटरचा होणार वापर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभास्थळी जनरेटरचा वापर करून विद्युत कार्यक्रमासाठी घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महावितरणकडे अद्यापही विद्युत जोडणीसाठी लेखी मागणी केली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जाहीर सभा आटोपताच दिग्गजही होतील रवाना
काँग्रेसच्यावतीने आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, पदयात्रा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी वर्धेत व सेवाग्राम येथे दाखल होणारे काँग्रेसचे दिग्गज नेते आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून सायंकाळी उशिरा वर्धा व सेवाग्राम येथून पुढील प्रवासाकरिता त्याच दिवशी रवाना होणार आहेत.
हेलिपॅडचे काम ४० टक्के पूर्ण
सेवाग्राम परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी एकूण तीन तात्पूर्ते हेलिपॅड तयार करण्यात येत आहे. सध्यास्थितीत या हेलिपॅड काम ४० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. रविवारी सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोदे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी हेलिपॅडची पाहणी करून तेथील कामाची माहिती जाणून घेतली. या हेलिपॅडवर सोमवारी चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयामुळे वर्धा शहरातील काही लहान रस्त्यांवरील वाहतूक वळती करण्यात येणार आहे. त्यामुळे काही मार्गाने वाहनचालकांना मंगळवार २ आॅक्टोबरला जाता येणार नसल्याचे पोलिसांनी कळविले आहे.