कापड गिरणीच्या आवारात ती बग्गी आहे ‘हेरिटेज’ म्हणून उभी
By Admin | Updated: September 25, 2015 02:46 IST2015-09-25T02:46:30+5:302015-09-25T02:46:30+5:30
ब्रिटीश राजवटीत राणी व्हिक्टोरिया मोठे घोडे जुंपलेल्या उंच चाकाच्या घोडागाडीतून बाहेर फिरायला जात होत्या.

कापड गिरणीच्या आवारात ती बग्गी आहे ‘हेरिटेज’ म्हणून उभी
‘व्हिक्टोरिया’ घोडागाडी देतेय स्मृतींना उजाळा
हेमंत चंदनखेडे हिंगणघाट
ब्रिटीश राजवटीत राणी व्हिक्टोरिया मोठे घोडे जुंपलेल्या उंच चाकाच्या घोडागाडीतून बाहेर फिरायला जात होत्या. महाराणी व्हिक्टोरिया ऐश्वर्याची प्रतिक ठरल्याने या गाडीलाही ‘व्हिक्टोरिया’ असे नाव मिळाले. तशीच घोडागाडी हिंगणघाट येथील कापड गिरणीचे मालक सेठ मयुरादास मोहता यांनीही शहरात फिरण्याकरिता त्या काळात आणली होती. ऐश्वर्याचे प्रतिक असलेली व्हिक्टोरिया बग्गी आता इतिहासजमा झाली असली तरी त्याचे नातू व गिमाटेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन वसंतकुमार मोहता यांनी आजोबांची आठवण म्हणून ही बग्गी संग्रही ठेवली.
कापड गिरणीच्या आवारात ‘हेरिटेज’ म्हणून जतन केलेली ही बग्गी मोहता परिवाराच्या वैभवाच्या आठवणींना उजाळा देत आहे. दोन किमी अंतरावर असलेल्या नागपूर मार्गावरील वृंदावन बागेची पाहणी करून बरोबर ६ वाजता बंगल्याच्या दारात ते व्हिक्टोरियानेच परत येत होते. त्यांचा हा दिनक्रम ठरलेला असायचा. बग्गीचा सारथी व मतदगार लालफेटे व परिटघडीचा पांढराशुभ्र गणवेश परिधान केलेला असायचा. बग्गीच्या घोड्यांचा अस्सल चांदीचा मुलामा असलेला सुमारे ५० किलो वजनाचा साज आता बंदिस्त पेटीत आहे. हा साज सेठ मयुरादास यांनी राजस्थानी कारागिरांकडून घडवून घेतला होता.
आधुनिकता व मोटर सायकलच्या युगात आलिशान बग्गी इतिहासजमा झाली आहे. मुंबईची व्हिक्टोरियादेखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पुरातन वस्तुप्रमाणेच व्हिक्टोरियाही संग्रहातील मौल्यवान स्मृती झाली आहे.
घोड्यांचा साज होता चांदीचा मुलामा केलेला
बग्गीच्या घोड्यांचा साज अस्सल चांदीचा मुलामा देऊन बनविलेला होता. त्याचे वजन सुमारे ५० किलो होते. आता हा साज बंदिस्त पेटीत ठेवण्यात आला आहे. हा साज सेठ मयुरादास यांनी खास राजस्थानी कारागिरांकडून घडवून घेतला होता, अशी माहिती आहे.
आधुनिकता व मोटर सायकलच्या युगात आलिशान बग्गी इतिहासजमा झाली असली तरी त्याला मिळालेली प्रतिष्ठा आजही वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. याचे जतन केल्याने त्याला महत्त्व प्राप्त होत आहे.
या बग्गीचे जतन करताना त्याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते.