श्वापदांमुळे शेतकऱ्यांची तारांबळ
By Admin | Updated: July 21, 2014 00:19 IST2014-07-21T00:19:34+5:302014-07-21T00:19:34+5:30
परिसरातील बहुतांश शेतीचा भाग हा जंगलव्याप्त आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना श्वापदापासून पिकांचे रक्षण करताना त्रास सहन करावा लागतो. पिंपळखुटा, गुमगाव, तरोडा, किन्हाळा, बोथली,

श्वापदांमुळे शेतकऱ्यांची तारांबळ
पिंपळखुटा : परिसरातील बहुतांश शेतीचा भाग हा जंगलव्याप्त आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना श्वापदापासून पिकांचे रक्षण करताना त्रास सहन करावा लागतो. पिंपळखुटा, गुमगाव, तरोडा, किन्हाळा, बोथली, चांदणी, दाणापूर व तळेगाव आदी गावांचा समावेश आहे. येथील शेतकऱ्यांनी वनविभागाला निवेदन देऊन या श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे; मात्र याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे.
येथील शेती निसर्गावर अवलंबून आहे. ओलिताची साधने उपलब्ध नाहीत. केवळ दोन टक्के शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे. कोरडवाहु शेतीचा भाग असल्याने उत्पन्नही मर्यादित आहे. यातही जंगली जनावरे उदरनिर्वाहाकरिता शेतीकडे येतात. पिकांची नासाडी करतात. यामुळे शेतकऱ्यांना जंगली श्वापदापासून पिकांच्या रक्षणार्थ कसरत करावी लागत आहे. जंगलाचा भाग गाव व शेताला लागून असल्याने दिवसभर रोही, डुकरे व हरीण तसेच देवगायी आदी जनावरांचा मुक्तसंचार असतो. बहुतेक गावात पाझर तलाव असल्याने जंगली जनावरे त्या ठिकाणी वास्तव्य करतात तर कधी गावाचा आधार घेतात. वन्यपशु कायदा असल्याने शेतकऱ्यांना प्राण्यांची हत्या करणे शक्य नाही. तसे केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागते. पिकांचे जनावरांचे रक्षण करताना श्वापदांना कोणतीही शारीरिक इजा होवू नये यांची दक्षता घ्यावी लागते.
पेरणी झाली त्या दिवसापासून तर संपूर्ण पीक घरी येईपर्यंत पिकांची रखवाली करावी लागते. प्रत्येक शेतकरी रात्री शेतात जागली करतो. रात्रीला शेतात जंगली जनावरे येवू नये याकरिता प्रत्येक शेतकऱ्यास वर्षाकाठी २० हजार रुपये खर्च येतो. तरी पण जनावरे शेतात घुसून उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान करीत आहे.
दरवर्षी सरासरी २५ टक्के उत्पन्न जंगली श्वापदे फस्त करतात. मात्र याची कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. या जनावरांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकऱ्याची दमछाक होते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणे तोट्याचे ठरत आहे. वन्यप्राणी पिकांची वाढच होऊ देत नाही. तुरीचे पीक तर कापणीला येण्याआधीच फस्त केले जाते. यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणी उशीरा सुरू झाली. पेरणी होताच डुकरांनी पेरलेल्या तुरी खाणे सुरू केले असून तुरीची दुबार व तिबार पेरणी करावी लागत आहे. तर पऱ्हाटी रोही खाऊन फस्त करीत आहे. ही समस्या आजची नसून पुर्ववत चालत आली आहे. लोकप्रतिनिधी याचा गांभिर्याने विचार करीत नाही.
वनविभाग शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने तातडीने या समस्येला निकाली काढण्याकरिता वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून तारेचे कुंपण करून देण्याकरिता शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)