प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ
By Admin | Updated: October 30, 2014 22:56 IST2014-10-30T22:56:13+5:302014-10-30T22:56:13+5:30
शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला;

प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ
आकोली : शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला; पण काही दिवस लोटले असतानाच झिरो प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ फासला जात असल्याचे दिसते़ आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नसल्याने औषधांची चिठ्ठी लिहून दिली जात असल्याचे समोर आले़ यामुळे चिठ्ठीमुक्त दवाखान्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
चिट्ठीमुक्त दवाखाना (झिरो प्रिस्क्रीप्शन) ही योजना सध्या वांझोटीच ठरली आहे़ आंजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधे खोकल्याचे औषधही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे़ यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे़ शासनाच्या योजना ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे़ लोकाभिमुख योजनांची घोषणा केली जाते; पण अंमलबजावणी शून्य असते़ यामुळे सामान्यांना योजनांचा लाभ होत नाही़ अशीच अवस्था शासनाच्या झिरो प्रिस्क्रीप्शन या योजनेची झाली आहे. रुग्णांना बाहेरून महागडी औषधी खरेदी करावी लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात आली होती़ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व गाजावाजा करण्यात आला; पण ढिसाळ नियोजनामुळे सामान्यांना दिलासा देणारी ही योजना आचके देत असल्याचे दिसते़ गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या बहुतांश योजना कागदावरच राबविल्या जात असल्याचे वास्तव आहे.
राजू परीहार रा. सुकळी (बाई) हे आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. त्यांना ताप व खोकल्याचा आजार होता. डॉक्टरांनी त्यांना चार गोळ्या दिल्या आणि खोकल्याचे औषध औषधी दुकानातून विकत घेण्याकरिता चिट्ठी लिहून दिली. वास्तविक, दवाखान्यात औषधी उपलब्ध नसेल तर कर्मचाऱ्यांकरवी औषधी दुकानातून औषध विकत घेऊन रुग्णांना द्यायचे आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे; पण सामान्य रुग्णांना योजनेचा लाभ मिळू नये, याकरिताच यंत्रणा राबताना दिसते. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्यसेवेचा विशेष लाभ होताना दिसत नाही़ आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच औषधी उपलब्ध करून द्यावी, तेथील कारभारात सुसुत्रता आणावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात आली आहे़(वार्ताहर)