अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:16+5:30
वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम भागातील हमदापूर, कोपरा, चाणकी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. सध्या शिवनगर ते हमदापूर या मार्गाचे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. अशातच या मार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांचे चाक मातीत अडकत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर काही दुचाकी घसरल्याच्याही घटना घडल्या.

अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील गारठ्यात वाढ झाली आहे. शिवाय ढगाळी वातावरण कायम असताना मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून कापूस, तूर, गहू तसेच भाजापाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम भागातील हमदापूर, कोपरा, चाणकी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. सध्या शिवनगर ते हमदापूर या मार्गाचे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. अशातच या मार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांचे चाक मातीत अडकत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर काही दुचाकी घसरल्याच्याही घटना घडल्या. परंतु, प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत पोहोचले नाहीत. नजीकच्या पवनार येथे मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दमदार पाऊस झाला. तर बुधवारी सकाळी ढगाळी वातावरण कायम असताना पावसाच्या सरी बरसल्या. हिंगणघाट शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील कपाशी, तूर आणि चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील अल्लीपूर परिसरात पावसाच्या सरी झाल्या. समुद्रपूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. नंदोरी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजता अचानक पाऊस कोसळला. त्यानंतर बुधवारी पहाटे ६ वाजता पुन्हा पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजेपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता. सध्या कापूस वेचणीच्या कामाला कापूस उत्पादकांकडून गती दिली जात आहे. अशातच अचानक आलेल्या पावसामुळे बोंडातून निघालेला कापूस भिजला. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सेलू तालुक्यातील घोराड तसेच परिसरात बुधवारी पहाटे आणि दुपारी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. कारंजा तालुक्यातील ठाणेगाव, सेलगाव, मोर्शी, हेटीकुंडी तर आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी झाल्या. यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. पिंपळखुटा भागातील तरोडा, गुमगाव येथे मंगळवारी रात्री तर बोरगाव (हा.) परिसरात बुधवारी दुपारी बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे शेतातील कापूस भिजला. मोझरी (शे.) परिसरात मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला वर्गीय पिकांसह कापूस, तूर पिकाला फटका बसला आहे. शिवाय थंडीत वाढ झाली आहे.
पिकांवर रोगांसह किडींचा प्रादुर्भाव
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहेत. शिवाय थंडीही कायम आहे. त्यामुळे उभ्या पिकांवर विविध रोगांसह किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी, कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी कपाशी, तूर, चणा व गहू उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.