चार दिवसांत खंडित केला जिल्ह्यातील 2 हजार 270 ग्राहकांचा विद्युत पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST2021-02-13T05:00:00+5:302021-02-13T05:00:11+5:30
१ एप्रिलनंतर विद्युत देयक न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून धडक थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण चार लाखांहून अधिक व्यक्तींसह संस्थांना महावितरण पुरवठा करीत असले तरी त्यापैकी तब्बल ६३ हजार व्यक्तींसह संस्थांनी १ एप्रिलपासून विद्युत देयक अदा केले नसल्याचे वास्तव आहे. ही थकबाकीची रक्कम ५१.८० कोटींच्या घरात आहे. हीच थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून सध्या धडक मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे वेळीच थकबाकी अदा करणाऱ्यांना व्याजाच्या रकमेतून सुट दिली जात आहे.

चार दिवसांत खंडित केला जिल्ह्यातील 2 हजार 270 ग्राहकांचा विद्युत पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचे कारण पुढे करून अनेकांनी त्यांच्याकडील विद्युत देयक वेळीच अदा केलेले नाही, तर विद्युत देयक माफ होईल, या आशेने अनेकांनी विद्युत देयक थकीत ठेवले. असे असले तरी वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यावर महावितरणकडून सोमवारपासून धडक थकीत विद्युत देयक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील चार दिवसांत महावितरणने तब्बल २ हजार २७० थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
१ एप्रिलनंतर विद्युत देयक न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून धडक थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण चार लाखांहून अधिक व्यक्तींसह संस्थांना महावितरण पुरवठा करीत असले तरी त्यापैकी तब्बल ६३ हजार व्यक्तींसह संस्थांनी १ एप्रिलपासून विद्युत देयक अदा केले नसल्याचे वास्तव आहे. ही थकबाकीची रक्कम ५१.८० कोटींच्या घरात आहे. हीच थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून सध्या धडक मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे वेळीच थकबाकी अदा करणाऱ्यांना व्याजाच्या रकमेतून सुट दिली जात आहे. याच सवलतीचा जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांनी लाभ घेत वेळीच विद्युत देयक भरावे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात येत आहे. १ एप्रिलपासून विद्युत देयक न भरणाऱ्या विद्युत ग्राहकांची वीज जोडणी सध्या कापली जात असल्याचेही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सर्वाधिक थकबाकी वर्धा विभागात
वर्धा विभागात १ लाख ७६ हजार वीज ग्राहक आहेत. असे असले तरी त्यापैकी तब्बल २७ हजार ६०० ग्राहकांकडू सध्या विद्युत देयकाची तब्बल २४.४० कोटींची रक्कम थकली आहे. ही थकबाकी वेळीच वसूल व्हावी, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून विशेष प्रयत्न होत आहेत.