हमदापूर मार्गावरील खड्ड्यांनी अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:41 IST2017-11-15T23:39:21+5:302017-11-15T23:41:18+5:30
हमदापूर-सेवाग्राम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे चुकविताना वाहनाला अपघात होतो.

हमदापूर मार्गावरील खड्ड्यांनी अपघातात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : हमदापूर-सेवाग्राम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे चुकविताना वाहनाला अपघात होतो. खड्ड्यांमुळे ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरट्रॉली पलटी झाली. सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले.
खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. दुचाकी चालकांना तर चांगलीच कसरत करावी लागते. अनेकदा वाहनांच्या आरशांना धक्का लागून वाहन अनियंत्रित होते. या रस्त्याचे बांधकाम करणे तर सोडाच साधी डागडुजी केली जात नाही. परिसरात ऊसाची तोडणी सुरू आहे. कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक याच मार्गाने होत आहे. कोपरा शिवारातून ऊसाची वाहतूक सुरू असताना रात्रीच्या सुमारास चालकास खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने ट्रॉली पलटली.
रात्रीची वेळ असल्याने चालकाला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे चालकाला रस्त्यावरच रात्र काढण्याची वेळ आली. या रस्त्यावर यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या. या घटनेनंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात होते काय, याकडे लक्ष आहे.
मांडगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसेस होतात नादुरुस्त
मांडगाव - जिल्ह्यातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या समुद्रपूर-वर्धा रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस अनेकदा फेल होतात. सोमवारी या मार्गावर बोथुडा (पाटी) नजीक व मांडगाव बसस्थानकावर बसेस बंद पडल्या. ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रवाशांचे यात हाल होतात. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी तसेच महामंडळाने या मार्गावर भंगार बसेस पाठवू नये अशी मागणी आहे.