विनयभंगाच्या तपासात पोलिसांकडून हयगय
By Admin | Updated: February 25, 2015 01:53 IST2015-02-25T01:53:17+5:302015-02-25T01:53:17+5:30
शारदानगर येथील एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरूद्ध तिने शनिवारी शहर ठाण्यात तक्रार केली.

विनयभंगाच्या तपासात पोलिसांकडून हयगय
वर्धा : शारदानगर येथील एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरूद्ध तिने शनिवारी शहर ठाण्यात तक्रार केली. याची माहिती सदर युवकाला कळताच त्याने रविवारी रात्री त्या महिलेच्या घरावर हल्ला केला. याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी तपासाच्या नावावर केवळ परिसरात येत चौकशी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. विनभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या युवकाचे नाव रंजीत खोडके रा. शारदानगर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार, रंजीत व फिर्यादी महिला एकाच घरमालकाकडे भाड्याने राहत आहेत. यात दोघांची ओळख असताना रंजीत याने सदर महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी सदर महिलेने शहर ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून रंजीत विरूद्ध भादंविच्या ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रार केल्याची माहिती रंजीत याला कळली असता त्याने रात्री सदर महिलेच्या घरावर हल्ला केला. याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांच्याकडून केवळ विचारपूस करण्यात आली. शिवाय फरार असलेल्या आरोपीचा शोध तुम्हीच घ्या असे उत्तर मिळाल्याचे सदर महिलने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास करून फरार असलेल्या रंजीतला अटक करण्याची मागणी सदर महिलेने केली आहे.(प्रतिनिधी)