महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरत जिल्हा काेविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या तब्बल ११५ पोलिसांनी अजूनही कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे पुढे आले आहे.कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कोविडची एन्ट्री होताच जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शिवाय नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन करून घेण्यासाठी लॉकडाऊन काळात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांना नागरिकांकडून कोविड योद्धा असेही संबोधल्या गेले. सध्या कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरत असून जिल्हा काेविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. कोविडची लस ही कोविड मृत्यू रोखण्यासह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला बऱ्यापैकी ब्रेक लावू शकते. परंतु, अजूनही खाकीतील तब्बल ११५ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोविडची लस घेतली नसल्याने त्यांच्या मनात लसीबाबत काही गैरसमज तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. लस न घेणाऱ्यांमध्ये चार पोलीस अधिकारी तर १११ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
१ हजार ६३६ पोलिसांनी घेतला पहिला डोस- जिल्ह्यात एकूण १ हजार ७५७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी १ हजार ६३६ पोलिसांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार ४९५ पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे सांगण्यात आले. तर अजूनही वैद्यकीय कारणे पुढे करून ११५ पोलिसांनी लस घेतलेली नाही.
लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी परिणामकारक आहे. त्यामुळे कुणीही लसीबाबत कुठलाही गैरसमज मनात बाळगू नये. गरोदर तसेच स्तनदा मातांसाठीही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा