आम आदमी विमा योजनेत सेवामूल्याच्या नावावर लूट
By Admin | Updated: July 27, 2014 23:53 IST2014-07-27T23:53:49+5:302014-07-27T23:53:49+5:30
दरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही

आम आदमी विमा योजनेत सेवामूल्याच्या नावावर लूट
तळेगाव (श्या़पं़) : दरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही शाळांत नोंदणीच्या नावावर दुप्पट सेवामूल्य आकारले जात असल्याचे समोर आले आहे. यातून सामान्यांची लूट केली जात आहे़
शासन भूमिहिन व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे़ २००७-०८ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेतही त्यांचा सहभाग आहे. या योजनेत इयत्ता नऊ ते बारावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना, ज्यांचे पालक भूमिहिन, शेतमजूर, एक हेक्टर बागायती, २ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र धारण करीत असेल, अशा विद्यार्थ्यांना १० महिन्यांपर्यंत १०० रुपये प्रतिमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेकरिता लाभार्थ्यांकडून २० व २२.५० रुपये सेवामूल्य घेण्यात यावे, असा शासननिर्णय आहे; पण तालुक्यातील काही शाळांमध्ये ेविद्यार्थ्यांकडून दुप्पट रक्कम आकारली जात असल्याचे दिनर्शनास आले आहे. महाआॅनलाईनने यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात अंदाजे ३६ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या पुढील टप्पा ३६ लाख लाभार्थ्यांची माहिती अपडेट करणे आहे. यात प्रत्येक लाभार्थ्याकरिता २० ते २२ रुपये ५० पैसे सेवामूल्य घ्यायचे आहे़ अनेक शाळांत ४० रुपये आकारले जात आहेत़ यामुळे लाभार्थ्यांची लूट होत असल्याचे दिसते़
शासन सामान्यांच्या हितासाठी योजना राबविते; पण त्या राबविणाऱ्या यंत्रणा योजनांचा बट्ट्याबोळ करीत असल्याचे दिसते़ शासन विवरणपत्र ५ व ६ मध्ये सेवामूल्य २० ते २२़५० रुपये घेण्याचे स्पष्ट निर्देश असताना दुप्पट रक्कम का घेतली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ सामान्यांच्या लुटीस जबाबदार कोण, शाळा की, ई-सेतू केंद्र, असा प्रश्नही उपस्थित आहे़ या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे़(वार्ताहर)