पीडित शेतकरी कुटुंबाची चेष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:57 IST2018-12-07T23:55:41+5:302018-12-07T23:57:13+5:30
नजीकच्या पळसगाव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांच्या शेतात अंदाजे १०० वर्ष जुने सागाचे असलेले झाड तोडण्यासाठी पॉवर ग्रीडचे अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचा जोर वापरून शेतात आले.

पीडित शेतकरी कुटुंबाची चेष्टा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : नजीकच्या पळसगाव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांच्या शेतात अंदाजे १०० वर्ष जुने सागाचे असलेले झाड तोडण्यासाठी पॉवर ग्रीडचे अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचा जोर वापरून शेतात आले. यादरम्यान शेतात लीला भट व तिचे दोन मुलंही शेतात काम करीत होते. लीला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली की, आम्हाला जोपर्यंत झाडांचा योग्य मोबदला देत नाही तोपर्यंत झाडे तोडू देणार नाही. आम्हाला १० ते १२ दिवसाचा अवधी द्या आम्ही कायदेशीर प्रक्रिया करायची आहे. परंतु मुजोर अधिकारी यांनी लिला यांच्याकडे दुर्लक्ष केले. व झाडे तोडण्याचे आदेश दिले. त्यावर तिथे उपस्थित असलेला लिला यांचा मुलगा राजू भट यांनी सुद्धा उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती करीत म्हटले की, तुम्ही झाडाला हात लावाल तर मी आत्महत्या करीन तरी सुध्दा अधिकारी नमले नाही. अखेरीस निरास झालेल्या राजू यांनी सरते शेवटी शेतातील गोठ्यात असलेले कीटकनाशक प्राशन केले होते. ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी लिला यांनी पावर ग्रीड कंपनीचे अधिकारी, तहसीलदार सेलू, सिंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या विरोधात सिंदी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक विलास काळे, वनक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, पॉवर ग्रीडचे जनरल मॅनेजर अनिल बासू नाईक , इतर अधिकारी, पीडित भट परिवार यांची पोलीस ठाण्याच्या आवारात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये पीडित कुटुंबातील लोकांनी घडलेली आपबिती सांगून आम्हाला आमच्या शेतातील झाडांचा योग्य मोबदला द्यावा अशी विनंती केली. त्यामध्ये लिला यांनी टॉवर लाईनच्या खाली येणारे ६१ झाडांची किंमत १६ लाख रुपये मागितले. त्यावर त्यावर उपस्थित पावर ग्रीडचे अधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत नव्याने सन २०१८ च्या नियमानुसार मूल्यांकन करून परत बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे.
लिला भट व तिचे तीन मुलं यांचा शेती व्यवसाय असून त्यांची पळसगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीमध्ये नदीला लागून काही जमिनीमध्ये वडिलोपार्जित १०० वर्षे जुनी सागाची झाडं आहे. भट यांनी आतापर्यंत १० वर्षाच्या फरकाने चार पाच वेळा कायदेशीर प्रक्रिया करून झाडे विकली आहे. त्यामुळे भट यांचे ही झाडे एकप्रकारे दर १० वर्षांनी येणारे नगदी पीक आहे.परंतु पॉवर ग्रीड कंपनी हे दर दोन वर्षांनी झाडे तोडणार असल्याने भट यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांचे लाखो रुपयाचे पिढ्यान पिढ्या येणारे पीक नाहीसे होणार आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण १०० वर्षांचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
शेतीच्या जमिनीत टॉवर उभारणी
शेतीच्या जमिनीवर टॉवर उभारणीचे काम करताना देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दराने शेतकºयांना आर्थिक मोबदला दिला जातो. तसेच या भागात येणाऱ्या शेतातील झाडांच्या मोबदल्यासाठी वेगळे निकष आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांना थातूरमातूर मदत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे. त्यांची प्रचिती सिंदी रेल्वे नजीकच्या पळसगाव येथील घटनेवरून येत आहे.