शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ? शिक्षणाधिकारी म्हणतात, हा पोषण आहार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:48 IST2021-08-02T13:47:47+5:302021-08-02T13:48:15+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मिळणारे तांदूळ हे प्लास्टिकचे असल्याची चर्चा रविवारी येथे रंगली.

शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ? शिक्षणाधिकारी म्हणतात, हा पोषण आहार..
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा- जिल्ह्यातील पवनार येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मिळणारे तांदूळ हे प्लास्टिकचे असल्याची चर्चा रविवारी येथे रंगली. यासंबंधीची तक्रार येथील पालक सुबोध लाभे यांनी पंचायत समिती सदस्य प्रमोद लांडे यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या घरी शालेय आहाराचे साहित्य पुरवले जात असते. या साहित्यात तांदूळात काही दाणे हे मोठ्या आकाराचे व चमकदार दिसल्याने प्लास्टिकचे तांदूळ वाटत असल्याच्या चर्चेला गावात पेव फुटले.
सरपंच शालिनी आदमाने यांनी तांदळाची तपासणी केली असता त्यात वेगळ््या प्रकारची चमक असलेले तांदूळ आढळून आले. त्यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी धनराज तायडे यांच्याशाी संपर्क साधला व त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी, हे तांदूळ जाणूनबुजून मिसळण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच या तांदळातून विद्यार्थ्यांना उपुयक्त घटक मिळणार असल्याचेही म्हटले. या तांदळातून विद्यार्थ्यांना फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, लोह आदी उपयुक्त घटक मिळणार आहेत असे त्यांचे सांगणे आहे. मात्र पालकांनी या तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी करण्याचा आग्रह धरला आहे.