शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी
By Admin | Updated: July 22, 2015 02:41 IST2015-07-22T02:41:30+5:302015-07-22T02:41:30+5:30
शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले.

शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी
धामणगाव वाठोडा येथील शेतकऱ्यांचे साकडे
वर्धा : शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले. पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी. भरपाई देता येत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धामणगाव (वाठोडा) येथील १८ शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी वन विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके रोही, रानडुक्कर व जंगली श्वापदांनी फस्त केली. यामुळे धामणगाव व वाठोडा या दोन्ही गावातील १०० एकरपेक्षा अधिक जमिनीतील पिके उद्ध्वस्त झाली. प्रवीण ठाकरे या शेतकऱ्याने श्वापदांच्या त्रासाबाबत अनेकदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. ग्रा.पं. मध्ये श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारा ठराव पारित करून त्याच्या प्रतीही पाठविल्या; पण कुठलीही कारवाई झाली नाही. शिवाय पत्रव्यवहारही न केला नाही. यामुळे श्वापदांनी पुन्हा पिकांची नासधूस केली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची १०० टक्के भरपाई द्यावी व तसे होत नसल्यास आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण ठाकरे, वसंत भोयर, पद्माकर भगत, सुभाष कुचेवार, रवी चाफेकर, गुलाब भोयर, वसंत भानसे, मिलिंद मेंढे, नामदेव धनवीज, अर्जुन तेलतुंबडे, मधुकर होणाडे, कपिल देशमुख, रूपचंद कांबळे, श्यामसुंदर ठाकरे, विजय राऊत, मोहन लोहकरे, विजय होणाडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन पंतप्रधान यांच्या नावाने देण्यात आले असून मुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी व आ. रणजीत कांबळे यांनाही निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
पाच एकरातील सोयाबीन पिकाची नासाडी
बोरधरण - हिंगणी परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अंकुरलेल्या पिकांची नासाडी केल्याने शेतकरी हैराण झाले. वानवहिरा येथील महिला शेतकरी प्रतीभा टापरे रा. नागपूर यांनी काही वर्षांपूर्वी वानविहरा शिवारात शेती घेतली. यावर्षी त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन पेरले. या पिकाची वन्य प्राण्यांनी नासाडी केली. परिणामी, शेतकरी संकटात सापडले. वन विभागाने लक्ष देत श्वापदाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हिंगणी परिसर जंगलव्याप्त आहे. येथे वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. जंगलातील वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करतात. प्रतीभा टापरे यांची वानविहरा शिवारात शेती असून पाच एकरात सोयाबीन पेरले. समाधानकारक पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक अंकुरले होते. एका रात्रीत अंकुरलेल्या पिकात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. कपाशी, तूर व सोयाबीनची पेरणी झाली आहे; पण वन्यप्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. रानडुकर, रोही, सांबराचे कळप पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी टापरे यांच्या तक्रारीवरून हिंगणीचे क्षेत्रसहायक कावळे व वनरक्षक तुपे यांनी पाहणी करून पंचनामा केला.(वार्ताहर)