पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 29, 2014 23:58 IST2014-07-29T23:58:18+5:302014-07-29T23:58:18+5:30
शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा शेतातील नुकसान पाहून ‘ब्रेनहॅमरेज’ने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास बरबडी शिवारात घडली. या घटनेमुळे गावात

पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्याचा मृत्यू
बरबडी येथील घटना : कर्जाचीही होती चिंता
वर्धा : शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा शेतातील नुकसान पाहून ‘ब्रेनहॅमरेज’ने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास बरबडी शिवारात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे़
चंद्रहास मुडे (५४) रा. बरबडी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागत आहे़ चंद्रहास मुडे यांनाही शेतात बराच पैसा खर्च करावा लागला. असे असताना पीक पाहीजे तसे उगवले नाही. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पिकांची पाहणी करण्याकरिता चंद्रहास मुडे हे शेतात गेले; पण शेतातील पिकांची वाईट स्थिती पाहून त्यांना अस्वस्थ वाटू लागले़ यातच आणखी नुकसान होणार आणि कर्जाचा डोंगर वाढणार, या चिंतेने त्यांना भोवळ आली व ते शेतातच पडले. ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना उपचारार्थ त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले; पण उपचार सुरू असतानाच त्यांचा ब्रेनहॅमरेजने मृत्यू झाला. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती दयनिय आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेने घर केले आहे़ शासनाने भरीव मदत करण्याची मागणी होत असताना शेतकऱ्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)