लोकसहभागातून पालटले शाळेचे स्वरूप
By Admin | Updated: December 18, 2015 02:42 IST2015-12-18T02:42:27+5:302015-12-18T02:42:27+5:30
मराठी शाळेतील घटती पटसंख्या व इंग्रजी शाळेकडे वाढलेला पालकांचा कल, यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत आहे;...

लोकसहभागातून पालटले शाळेचे स्वरूप
सेलगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श : अन्य गावांनीही प्रेरणा घेणे गरजेचे
अशोक पठाडे सेलगाव (लवणे)
मराठी शाळेतील घटती पटसंख्या व इंग्रजी शाळेकडे वाढलेला पालकांचा कल, यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत आहे; पण या परिस्थितीला येथील जि.प. शाळा अपवाद ठरली आहे. ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या श्रमदानातून या शाळेचे स्वरूपच पालटले आहे. ही शाळा जिल्ह्यात आदर्शवतच ठरू पाहत आहे.
या गावात एक माध्यमिक शाळा असून इयत्ता पाच ते दहापर्यंत वर्ग आहेत. जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. जि.प. शाळेत सात शिक्षक असून विद्यार्थी संख्याही दीडशेच्या वर आहे. या शाळेने आजवर अनेक पदाधिकारी, अधिकारी घडविले. या शाळेतून दरवर्षी नवोदय, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरतात. शाळेला जुनीच परंपरा आहे; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे आवार भिंतीसाठी निधी मिळाला नाही. परिणामी, आवार भिंत नसलेली शाळा, असे चित्र होते. शासनाच्या मूल्यमापन स्पर्धेतही शाळा मागे पडली. याचे शल्य ग्रामस्थ व शिक्षकांना बोचत होती. आवारभिंत नसणे, हेच कारण शाळा मागे पडण्यास कारणीभूत ठरले.
यामुळे ग्रामस्थांनी २६ सप्टेंबरला शाळेसमोर सभा बोलविली. सभेला शिक्षक, ग्रा.पं. पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, गावातील तरूण, पालक व महिला उपस्थित होत्या. शिवाय केंद्रप्रमुख विजय राठी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना ‘समाज सहभाग’ हा पर्याय सुचविला व तो ग्रामस्थांना रूचला. नागरिकांनी शाळेला लागणाऱ्या सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाची माहिती गोळा केली व वर्गणीला सुरूवात केली. काहीच दिवसांत १ लाख १० हजार रुपये गोळा झाले. काहींनी गेट, कुंपण तार, पंखे, फिटींग साहित्य, पेंटींग खर्च, रंगरंगोटी आदी खर्चांची जबाबदारी उचलली. यामुळे लोकसहभागातून शाळेचे रंगरूप पालटले. संगणकीय खोली, सर्वत्र कचराकुंड्या, फुलझाडे, प्रत्येक खोलीत पंखे आदी सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या. या शाळेतील परसबाग आकर्षण ठरत आहे. लोकसहभागातून शाळेचा झालेला विकास तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून अन्य गावांनीही प्रेरणा घेणे गरजेचे आहे.