चंदीच्या दुधात ‘पाकिटाची’ भेसळ
By Admin | Updated: June 5, 2016 01:45 IST2016-06-05T01:45:11+5:302016-06-05T01:45:11+5:30
मुलांना शुद्ध आणि पौष्टिक दूध मिळावे, त्यात कुठलीही भेसळ नसावी, या आशेने नागरिक जवळपासच्या गावखेड्यातून

चंदीच्या दुधात ‘पाकिटाची’ भेसळ
चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात : विश्वासू दूध विक्रेत्याकडूनच होतो ग्राहकांचा विश्वासघात
रूपेश खैरी वर्धा
मुलांना शुद्ध आणि पौष्टिक दूध मिळावे, त्यात कुठलीही भेसळ नसावी, या आशेने नागरिक जवळपासच्या गावखेड्यातून व काही शहरातील गोपालकांकडून दुधाची खरेदी करतात. हे दूध विक्रेत्याच्या घरच्या गायीचे असून ते शतप्रतिशत शुद्ध असल्याचा नागरिकांचा विश्वास असतोे; मात्र त्यांच्या घरी दूध आणणाऱ्या या दूध विक्रेत्याकडून त्यांचा विश्वासघात होत आहे, याची त्यांना पुसटशी कल्पना नाही. हे दूध विक्रेते घरून गाईचे दूध आणत असल्याचे म्हणत नारिकांच्या माथी पाकीटचे दूध मारत असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उजेडात आली आहे.
आसपाच्या गावातून वर्धेत येत असलेल्या अनेक दूध विक्रेत्यांच्या अनेकांच्या घरोघरी महिनेवारी चंदी आहेत. त्यांच्याकडून आलेले दूध शुद्ध असल्याच्या खात्रीमुळे नागरिक त्याची कुठलीही शाहनिशा न करता ते आपल्या चिमुकल्यांना देत आहेत. यामुळे बालकांना दुधातून आवश्यक असलेले प्रोटिन्स मिळते, याबाबत साशंकता आहे. दुधाच्या नावावर नागरिकांना केवळ पांढऱ्या रंगाचे पाणी दिल्या जात आहे. याची पुसटशी कल्पनाही त्यांना नसावी.
नागरिकांना शुद्ध दूध देण्याच्या नावावर वर्धेत हा गोरखधंदा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आसपासच्या गावातील हे दूध विक्रेते वर्धेत येताच आर्वी नाका किंवा बजाज चौक येथील पाकीटचे दूध विकणाऱ्यांकडून पाकीट विकत घेत ते एका छोट्या केटलीत गोळा करून मोठ्या केटलीत टाकत असतात. एवढेच नाही तर या दूधात पाणीही मिसळल्या जात आहे. यामुळे नागरिकांना मिळणारे दूध किती शुद्ध आणि किती पौष्टिक याचा अंदाज बांधणे कठिणच. हा प्रकार करताना आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या ग्राहकांचा आपण विश्वासघात करीत असल्याची साधी भीतीही त्यांना वाटत नाही.
दिवस उन्हाळ्याचे असो वा हिवाळ्याचे हा व्यवसाय वर्षभर सुरूच असतो. वर्धेत बऱ्याच विक्रेत्यांकडून ही भेसळ सुरू असल्याची माहिती आहे. पाकीटचे दूध म्हटल्यावर पालक त्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करतात. यामुळे मुलांच्या दुधाकरिता या चंदीवाल्यांवर त्यांचाकडून विश्वास ठेवण्यात येतो; परंतु वर्धेत घडत असलेल्या या प्रकारामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात ७,९६० लिटरने घट
उन्हाळ्याच्या दिवसात दूधाच्या उत्पादनात घट होणे स्वाभाविक आहे. वर्धेत इतर दिवसात सरासरी ४४ हजार ४६० लिटर दूधाचे उत्पादन होते. ही नोंद केवळ संकलन केंद्राची आहे. या व्यतिरिक्त चंदीच्या नावावर नागरिकांच्या घरी थेट जाणाऱ्या दुधाची कुठेही नोंद नाही. वर्धेत यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात सरासरी ३६ हजार ५०० लिटरची नोंद झाली आहे. यावरुन जिल्ह्यात एकूण ७ हजार ९६० लिटरने दुधाच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. यामुळे मागणीनुसार दूध देण्यासाठी हा खटाटोप आहे.
तरीही वर्धेतून १४ हजार लिटर दुधाची निर्यात
वर्धेत उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचे उत्पादन कमी होत असले तरी जिल्ह्यातून आजच्या घडीला अजूनही १४ हजार लिटर दूध निर्यात केले जात आहे. यात नागपूर जिल्ह्यात १० हजार ५०० तर अमरावती जिल्ह्यात ३ हजार ५०० लिटर दूध जात आहे. हे दूध जिल्ह्यात ठेवल्यास येथील मागणी पूर्ण होऊ शकते.