रुग्ण सापडण्याची गती वाढली; पण परिस्थिती ‘इन कंट्रोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST2021-03-22T05:00:00+5:302021-03-22T05:00:07+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

रुग्ण सापडण्याची गती वाढली; पण परिस्थिती ‘इन कंट्रोल’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या कोविडबाधित नवीन रुग्ण सापडण्याची गती वाढली आहे. त्यामुळे सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. असे असले तरी सध्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती ‘इन कंट्रोल’ असल्याने तसेच दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याने पैसे द्या अन् बेड्स उपलब्ध करून घ्या, या चिरीमिरीच्या गैरप्रकाराला थारा नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील सुत्रांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे सध्यातरी मोठा ताण कोविड रुग्णालयांवर ओढवलेला नाही. असे असले तरी गंभीर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
सध्यास्थितीत त्रिसूत्रींचे पालन आवश्यकच
सध्याच्या कोरोना काळात प्रत्येक नागरिकाने वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या कोविड बाधित नवीन सापडण्याची गती वाढली आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्याची परिस्थिती इन कंट्रोल आहे. परंतु, नागरिकांनी गाफील न राहता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. नागरिक गाफील राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.