तालुक्यात पुन्हा दिसू लागणार फळबागा
By Admin | Updated: August 24, 2014 23:40 IST2014-08-24T23:40:52+5:302014-08-24T23:40:52+5:30
पारंपारिक पिके घेताना शेतीतील उत्पन्न वाढावे या हेतूने शेतकरी फळबागा लावण्याकडे वळल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असल्याने तालुक्यात पुन्हा फळबागा फुलणार असल्याचे

तालुक्यात पुन्हा दिसू लागणार फळबागा
विजय माहुरे - घोराड
पारंपारिक पिके घेताना शेतीतील उत्पन्न वाढावे या हेतूने शेतकरी फळबागा लावण्याकडे वळल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असल्याने तालुक्यात पुन्हा फळबागा फुलणार असल्याचे चित्र आहे.
सेलू तालुका हा केळी बागायतदारांचा तालुका म्हणून विदर्भात ओळखला जात होता; मात्र अलीकडच्या काळात दीड वर्षाचे असलेले पण महागडे असलेले पीक अन् केळीला उत्पादन खर्चानुसार योग्य भाव मिळत नसल्याने सध्या तालुक्यात नावापुरत्याच केळीच्या बागा शिल्लक राहिल्या आहेत.
शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गत तीन वर्षांपासून फळ लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत ही योजना कार्यान्वित होत आहे.
शेताच्या बांधावर फळबाग ही योजना तालुका कृषी विभागांतर्गत राबविली पण याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे बोलल्या जात आहे.
शेतात फळबाग योजना यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी फळबाग लावण्यासाठी अर्ज केले आहेत.
सेलू पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये २२-२३ हेक्टर २०१३-१४ मध्ये ४२ हेक्टर तर २०१४-१५ मध्ये ११६ हेक्टरचे उद्दीष्ट ठरविले आहे. हे उद्दीष्ट शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाढू शकले. तालुक्यात आतापर्यंत १८० हेक्टरच्या आसपास ही लागवड होत आहे.
यात तीन वर्षांपर्यंत संत्रा-मोसंबी व लिंबू यासाठी एक लाख ११ हजार तर डांळींबासाठी एक लाख १३ हजार रुपयांचे अनुदान सफाई, खड्डे, कलमा आणणे, पाणी, खत व मशागतीकरिता मिळणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना कलमा (रोपे) पंचायत समिती कार्यालयातून देण्यात येत आहे. बोरधरण, काटोल व शेंदूरजनाघाट येथून ही रोपे आणली आहे.
यात डाळींब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आवळा व सिताफळ या कलमांचा समावेश आहे.
फळाच्या कलमा शेतकऱ्यांना देण्यात आल्या यावेळी कृषीअधिकारी एन. आर. कीटे, कृषी विस्तार अधिकारी मनोज नागपुरकर, बी. बी. बिल्लेवार, तांत्रीक अधिकारी योगेश रोडे, नितिन कांबळे यांचे सहकार्य मिळत आहे.