तालुक्यातील एकमेव तीर्थक्षेत्र रस्त्यापासून वंचित
By Admin | Updated: August 4, 2014 23:54 IST2014-08-04T23:54:23+5:302014-08-04T23:54:23+5:30
श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत येणारा नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत अनेक वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना

तालुक्यातील एकमेव तीर्थक्षेत्र रस्त्यापासून वंचित
टाकरखेड : श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत येणारा नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत अनेक वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना दशकापासून त्रास सहन करावा लागत आहे़ एकीकडे विकासाचा कांगावा केला जातो तर दुसरीकडे भाविकांची अवहेलना होत असल्याचे दिसते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे़
नांदपूर ते टाकरखेड हा केवळ सहा किमी लांबीचा रस्ता गत कित्येक वर्षांपासून परिपूर्ण दुरूस्तच करण्यात आलेला नाही़ या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचलेले आहे़ बऱ्याच ठिकाणी रस्ता जमिनीत रूतला असून डांबरीकरण उखडले आहे. यामुळे या रस्त्याने ये-जा करताना खड्डे व चिखलातून मार्ग शोधावा लागतो. कित्येक वर्षांपासून भाविकांना टाकरखेड येथे जाताना मरणयातनाच सोसाव्या लागत आहेत़ येथे महाशिवरात्रीला जन्मोत्सव तर रक्षाबंधनला पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो़ दोन्ही उत्सवाला विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे एक लाख भाविक ये-जा करतात़ वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते; पण त्यांना हा रस्ता आजपर्यंत कधीही व्यवस्थित झाल्याचे दिसले नाही. रस्ता कधी एका बाजूने व्यवस्थित असला तर दुसऱ्या बाजूने नादुरूस्तच दिसतो़
लहानुजी महाराज देवस्थानात उत्सव असला की, थातूरमातूर मुरूम टाकून खड्डे बुजविले जातात; पण कायम उपाययोजना केल्या जात नाहीत़ अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या रस्त्याची दुरूस्ती कधी होणार, हे अधिकारीही स्पष्टपणे सांगू शकत नाहीत़ हजारो भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदर रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करावे, अशी मागणी लहानुजी महाराज देवस्थान समितीसह परिसरातील नागरिक व भाविकांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)