मुनगंटीवारांनाच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राहू द्या !
By Admin | Updated: July 9, 2016 02:14 IST2016-07-09T02:14:25+5:302016-07-09T02:14:25+5:30
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

मुनगंटीवारांनाच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राहू द्या !
मुख्यमंत्र्यांना साकडे : मंत्रिमंडळ विस्तार होताच पालकमंत्री बदलाची चर्चा
वर्धा : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धेसह त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर ते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडतील, अशी चर्चा वर्धेकरांना अस्वस्थ करीत आहे.
इतकेच नव्हे, तर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्रीपद सोडले, तर मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मुंबईतील डोंबीवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार, अशीही चर्चा रंगत आहे. मंत्री मंडळ विस्तारापूर्वी यवतमाळचे आमदार मदन येरावार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून त्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार अशी चर्चा होती. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही चर्चा मागे पडली असून ना. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
वर्धेतील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे
वर्धा : अर्थमंत्री व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतुद व्हायला लागली. आघाडी सरकारच्या काळातील सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला गतीच आली नाही, तर निधीचीही तरतुद करण्यात आली. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल बघता भविष्यात वर्धा विकासात अगे्रसर राहील, असे चित्र निर्माण झाले. त्यांनी केवळ विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर जिल्ह्याच्या विकासाची दिशाही निश्चित केली आहे.
अशातच त्यांच्याकडून पालकमंत्रीपद निघाले, तर विकासाची गती खुंटतील, अशी भीतीही वर्धेकरांना सतावू लागली आहे. वर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार हे सेवाग्राम विकास आराखड्याबाबतची बैठक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने मुंबईत आहेत. त्यांनाही पालकमंत्री बदलाची चाहुल लागताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून ना. सुधीर मुनगंटीवार यांनाच पालकमंत्री म्हणून कायम ठेवावे, असा आग्रह धरला आहे. सोबतच सुधीर मुनगंटीवार यांनाही वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडू नये, यासाठी साकडे घातल्याची माहिती आहे.
याबाबत खा. रामदास तडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. आज रात्री मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार असून यावेळीही ही मागणी त्यांच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचेही खा. तडस म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)