दुहेरी अपघातात एक ठार, एक जखमी
By Admin | Updated: July 5, 2014 23:43 IST2014-07-05T23:43:38+5:302014-07-05T23:43:38+5:30
येथील विकास चौकात नागपूर-वर्धा महामार्गावर स्कुटीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास कंटेनरने धडक दिली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला़

दुहेरी अपघातात एक ठार, एक जखमी
सेलू : येथील विकास चौकात नागपूर-वर्धा महामार्गावर स्कुटीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास कंटेनरने धडक दिली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला़ दरम्यान, गर्दी झाल्याने ४़३० च्या सुमारास तेथेच दुसरा अपघात झाला़ यात मोटर सायकल चालक जखमी झाला़ या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करीत गतिरोधक बसविण्याची मागणी केली़
मारोती पांडुरंग वैरागडे (५८) रा़ सेलू (ह़मु़ बेला) असे मृतकाचे नाव आहे़ त्यांच्या चुलत पुतणीचे लग्न होते़ यामुळे काही दिवसांपासून ते मुक्कामी होते़ शनिवारी नामदार नितीन गडकरी यांचा बसस्थानक परिसरात कार्यक्रम होता़ त्याच परिसरात एका दुकानात मित्राशी गप्पा झाल्यानंतर काही कामानिमित्त ते विकास चौकात गेले़ परत येत असताना नागपूरकडून येणाऱ्या डाक पार्सल कंटेनर क्ऱ एम़ एच़ ४० एक्स़ ३५५२ ने त्यांना मागाहून धडक दिली़ यात खाली पडलेल्या वैरागडे यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ मारोती वैरागडे हे लोकजीवन विद्यालय बेला येथून सेवानिवृत्त झाले होते़ त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे़ घटनास्थळावरून पसार झालेला अपघातग्रस्त ट्रक जुन्या एमएसईबी कार्यालयाजवळ नेऊन तेथून चालक, क्लिनर पसार झाले़ त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात जाऊन संतप्त लोकांपासून वाचण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी कंटेनरमधील अरविंदकुमार दीपनारायण पासवान व शिवलखन पासवान रा़ गुमठी़ जि़ हजीपूर (बिहार) यांना ताब्यात घेतले़
अपघातस्थळी गर्दी झाल्याने दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी प्रदीप ज्ञानेश्वर चापडे (५५) रा. जुनगड यांच्या मोटर सायकललाही अपघात झाला़ दोन्ही बाजूने आलेल्या वाहनांतून मार्ग काढताना त्याच्या मोटार सायकल क्र. एम़एच़ ३२ डी़ १५३९ ला धडक बसली़ यात त्यांचा पाय फॅक्चर झाला़ त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने संयम सुटलेल्या जमावाने वर्धा-नागपूर महामार्ग अडविला़ नारेबाजी करीत एक तास रस्ता रोखल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नायब तहसीलदारांनी चार दिवसांत गतिरोधक बांधण्याबाबत संबंधित विभागाच्या सांगण्यावरून भाजपाचे वरुण दप्तरी यांना लेखी आश्वासन दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)