चिमुकल्या निर्भयाची व्यथा ऐकून अधिकारीही सुन्न
By Admin | Updated: August 24, 2014 00:08 IST2014-08-24T00:08:41+5:302014-08-24T00:08:41+5:30
सिंदी (रेल्वे) येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य दिवसागणिक वाढत आहे. याबाबत ‘लोकमत’कडून खऱ्या आरोपींवर कारवाई व्हावी, या अनुषंगाने सातत्याने

चिमुकल्या निर्भयाची व्यथा ऐकून अधिकारीही सुन्न
प्रकरण नव्या वळणावर : एसीपींना गांभीर्य पटवून देणार
वर्धा, सिंदी (रेल्वे) : सिंदी (रेल्वे) येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य दिवसागणिक वाढत आहे. याबाबत ‘लोकमत’कडून खऱ्या आरोपींवर कारवाई व्हावी, या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शनिवारी ‘लोकमत’ वृत्तपत्र घेऊन महिला व बाल कल्याण विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे पथक चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सेवाग्राम रुग्णालयात पोहचले. चिमुकलीची अवस्था बघून या पथकातील अधिकारीही सुन्न झाले.
सदर प्रकरणात या पथकाने सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर चिमुकलीवर एकापेक्षा अधिक लोकांनी अत्याचार केल्याची बाब तिला झालेल्या गंभीर जखमावरुन लक्षात येत असल्याचे सांगितले. मात्र पोलीस प्रशासनाकडून एकालाच अटक करण्यात आली. अन्य आरोपीवर पोलीस का कारवाई करण्यात धजावत नाही, याकडेही लक्ष वेधले. या पथकात महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप राठोड आणि अधिकारी अर्चना यांचा समावेश होता. त्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे होते. या पथकाने मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करून शासकीय नियमानुसार मुलीला लागणारी सर्व मदत करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुलीच्या प्रकृतीबाबत छेडले असता मुलीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार झाला आहे. हे मान्य केले. ुइतकेच नव्हे, मुलीवर एकापेक्षा अधिक लोकांनी लैंगिक अत्याचार केला असावा, ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येते, अशीही माहिती दिली. सदर मुलीचे पुनर्वसन करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना मनोधर्य योजनेतून अधिकाअधिक मदत मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(लोकमत न्यूज नेटवर्क)
महिलांचे पथक सिंदीत
एका सहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण ‘लोकमत’ने उचलून धरल्यानंतर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत गंभीर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. मुलीचे वडिल दोन आरोपी होते, असे सांगत असताना पोलीस प्रशासन मात्र एकावरच कारवाई करून मोकळे झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक महिला प्रबोधिनी संघटनेच्या प्रा. नुतन माळवी, श्रेया गोडे, मीनाक्षी चहांदे, वनिता चिंचघाटे, गुडू अली या पाच जणांचे पथक सिंदी (रेल्वे) येथे पोहचले. या पथकाने ठाणेदार परमार यांची भेट घेतली. त्यांच्यासह पीडित ज्या वस्तीत वास्तव्य करते, या वस्तीला भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांनीही या प्रकरणात आरोपी दोन असल्याचे या पथकाला सांगितले.
आरोपीचा पिता म्हणतो, खरे आरोपी वेगळेच
या पथकाने लोकांकडून घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अटक करण्यात आरोपीच्या वडिलाने अन्य दोघेजण या प्रकरणात खरे आरोपी असून त्यांना सोडून आपल्या मुलाला अडकविल्याचा आरोप पोलिसांवर केला. त्यांनी रज्जू आणि संता यांनी मुलीशी कुकर्म केल्याचा आरोपही महिलांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केला. एकूणच सर्व बाबींचा विचार करता चिमुकलीवर एकापेक्षा अधिक लोकांनी अत्याचार केल्याची बाब पुढे आली असल्याची माहिती प्रा. नुतन माळवी यांनी दिली. जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून खऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.