आता ग्रामस्वच्छता अभियान दुर्लक्षित
By Admin | Updated: August 22, 2014 00:03 IST2014-08-22T00:03:21+5:302014-08-22T00:03:21+5:30
गाव स्वच्छ व सुंदर दिसावे, ते निर्मलग्राम व्हावे या हेतूने संतांच्या नावाने सुरू झालेले ग्रामस्वच्छता अभियान सध्या थंडबस्त्यात दिसते़ नरेगातील कामाच्या व्यस्ततेमुळे या योजनेकडे जवळपास सर्वच

आता ग्रामस्वच्छता अभियान दुर्लक्षित
घोराड : गाव स्वच्छ व सुंदर दिसावे, ते निर्मलग्राम व्हावे या हेतूने संतांच्या नावाने सुरू झालेले ग्रामस्वच्छता अभियान सध्या थंडबस्त्यात दिसते़ नरेगातील कामाच्या व्यस्ततेमुळे या योजनेकडे जवळपास सर्वच ग्रा़पं़ चे दुर्लक्ष झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे़ यावरून नवीन योजना आल्या की, त्यावर अंमल करायचा आणि जुन्या योजनांकडे पाठ फिरवायची, असाच प्रकार दिसून येतो़
तीन वर्षांपूर्वीपर्यंत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानात हिरिरीने भाग घेतला़ गावातील युवा मंडळींसह ग्रामस्थांनाही स्वच्छ गाव सुंदर गाव याचे महत्त्व जाणवू लागले होते़ या अभियानातून अनेक ग्रामपंचायतींनी गावाचा लौकिक वाढवून पुरस्कार प्राप्त केलेत; पण अलिकडे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली़ या योजनेच्या बैठकींसाठी ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयातच महिन्याचे अर्धेधिक दिवस व्यस्त राहतात़ या कामावरील मजुरांचे मस्टर, हजेरी पत्रक, बँकेत पैसे जमा होईपर्यंत लक्ष ठेवणे, फळबाग, सिंचन विहीर, पांदण रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड आदी कामांचा यात समावेश आहे़ यामुळे ग्रामसचिवास गाविकासाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे़ योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती केली असली तरी एका मजुराची अनेक कागदपत्रे बनवावी लागत असल्याने तेही व्यस्तच असतात़
ग्रामसचिवावर कामाचा व्याप वाढला असताना एका ग्रामसेवकाकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने व अर्धाधिक वेळ पंचायत समिती कार्यालयातच जात असल्याने ग्रामस्थांना ग्रामसचिवाची प्रतीक्षा करावी लागते़ नरेगा योजना चांगली असून यात गावखेड्यात रोजगार उपलब्ध झाला आहे़ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्ष मोठे झाल्यानंतर तालुका हिरवागार होईल; पण या योजनेत ग्रामपंचायतींनी सर्वस्व पणाला लावल्याने ग्रामस्वच्छता अभियान सध्या तरी दुर्लक्षित झाल्याचे दिसते़ सध्या नवीन योजना राबविण्यावर भर दिला जात असताना जुन्या चांगल्या योजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे़ यामुळे सर्व योजनांच्या समतोल अंमलाकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)