आता गावोगावी मिळणार गॅस सिलिंडर
By Admin | Updated: December 13, 2014 22:44 IST2014-12-13T22:44:58+5:302014-12-13T22:44:58+5:30
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, आष्टी तालुका कार्यकारी मंडळ, मानव जोडो संघटन, श्री गुरूदेव युवा संघटन यांनी संयुक्तरित्या १ जुलै रोजी तहसीलदारांना गॅस सिलिंडर वितरक नरेंद्र दाभे विरूद्ध

आता गावोगावी मिळणार गॅस सिलिंडर
साहुर : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, आष्टी तालुका कार्यकारी मंडळ, मानव जोडो संघटन, श्री गुरूदेव युवा संघटन यांनी संयुक्तरित्या १ जुलै रोजी तहसीलदारांना गॅस सिलिंडर वितरक नरेंद्र दाभे विरूद्ध तक्रार दिली. कारवाई न झाल्याने ९ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले़ दुसऱ्याच दिवशी दाभे याने सिलिंडर भरून गाडी साहूर येथे पाठविली; पण तहसीलदार लेखी देत नाही, तोपर्यंत कुणीही सिलिंडर घेणार नाही, असे ठरविण्यात आले़ अखेर बुधवारी (दि़१०) तहसीलदारांनी प्रत्येक गुरूवारी गावोगावी सिलिंडर वाटप करण्याचे लेखी दिले़ यानंतर सर्व ग्राहकांना रितसर सिलिंडर वाटप करण्यात आले़
संपूर्ण तालुक्यात गावोगावी जाऊन सिलिंडर वाटप करण्याचे आदेश असताना अनुसया गॅस एजन्सीचे मालक दाभे, त्यांच्या पत्नी व मुलगा ग्राहकांना हुसकावून लावत होते़ प्रत्येक गावातील दलालांना तो ५० सिलिंडर आधीच चढ्या भावात देत होता़ अनेक ग्राहकांपासून १००० ते १२०० रुपये दर आकारून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत होता़ या दादागिरीमुळे संपूर्ण तालुका त्रस्त होता. याविरूद्ध आष्टी येथील संदीप अग्रवाल यांनी न्यायालयात प्रकरणही दाखल केले होते़ शेकडो खोटे ग्राहक तयार करून दलालांमार्फत त्याने सामान्य जनतेची पिळवणूक करून अल्पावधीत मोठी माया गोळा केली.
याविरूद्ध गुरूदेव सेवा मंडळ आष्टीचे तालुका सेवाधिकारी दीपक खरडे, मानवजोडो संघटनचे रमेश सरोदे व युवा संघटन साहुर यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले़ या सत्याग्रहाने दाभे याचे धाबे दणानले़ प्रत्येक गुरूवार आणि ज्याला मधे सिलिंडर लागेल, त्यालाही सिलिंडर आणून देईल, अशी विनंती त्यांनी केली़ तहसीलदार आष्टी यांनी उपोषण स्थळी प्रतिक दाभे यास बोलवून चर्चा केली़ प्रत्येक ग्राहकाशी आदरपुर्वक वागण्याची समज दिली. यावेळी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या़ तहसीलदारांनी प्रत्येक गुरूवारी गावोगावी सिलिंडर पोहोचण्यिात येतील, अशी लेखी ग्वाही दिली़ या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले़
उपोषणकर्त्यांमध्ये वयोवृद्ध बाळकृष्ण कडू, जयप्रकाश भोरे, दीपक खरडे, प्रशांत ढोले, विशाल लाड, पांडुरंग हिवरे, बाबाराव वरकड, दीपक काकपुरे, सुरेश ठाकरे, वासुदेव चांदुरकर आदींचा सहभाग होता़ उपोषणाचे हत्यार उपसताच सिलिंडर वितरक वठणीवर आल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़(वार्ताहर)