‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य!

By Admin | Updated: December 16, 2015 02:13 IST2015-12-16T02:13:25+5:302015-12-16T02:13:25+5:30

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे शब्द शाळांच्या मुलांकडून प्रभातफेरीच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळते.

'No Vehicle Day' can be easily possible! | ‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य!

‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य!

सामाजिक संघटना व प्रशासनाच्या पुढाकाराची गरज : केवळ तीन किमी प्रवासासाठी वाहनाचा वापर
राजेश भोजेकर  वर्धा
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे शब्द शाळांच्या मुलांकडून प्रभातफेरीच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळते. या अनुषंगाने निसर्ग सेवा समिती आणि नंतर अनेकांनी हे घोषवाक्य कृतीतून उतरविताना वर्धेकरांनी बघितले. शेजारच्या चंद्रपूरकरांनी वातावरणातील वायू प्रदूषणावर काही प्रमाणात का होईना मात करता यावी म्हणून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळायला सुरुवात केली. वर्धेतून नेहमीच क्रांतिकारी गोष्टींचा प्रारंभ झाला आहे. सारासार विचार केल्यास ‘नो व्हेईकल डे’ पाळणे वर्धेकरांसाठी सहज शक्य आहे.
वर्धा शहराचा व्यास सुमारे सहा किमीचा आहे. एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायचे असल्यास तीन किमीचा प्रवास करावा लागतो. वास्तविक, एक ते दीड किमी अंतरात सर्वकाही आहे. असे असताना दुचाकी व चारचाकींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे अंतर सायकलद्वारे पार करणे शक्य आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुराड्यांमुळे शहराच्या वायू प्रदूषणात भरच घालण्याचे काम होत आहे. वर्धेकरांनी ‘नो व्हेईकल डे’ पाळायला सुरुवात केल्यास शहरात होणारे वायू प्रदूषण टाळता येणे सहज शक्य आहे.

शहरात अनेक सामाजिक संघटना, पुढाकार कोण घेणार?
शहरात अनेक स्वयंसेवी व सामाजिक संस्था आहेत. युवक संघटनाही आहे. इतकेच नव्हे, तर शिक्षण, मुख्याध्यापकांसह कामगार व कर्मचारी वर्गांच्याही संघटना सक्रिय आहेत. शहरातील कोणतेही स्थळ तीन. किं.मी.पेक्षा लांब नाही. अधिकारी वर्गांनाही त्यांची कार्यालये हाकेच्या अंतरावर आहे. ते आपल्या सदनिकेपासून कार्यालयात पायीही जावू शकतात वा सायकलचाही वापर करू शकतात, अशी परिस्थिती आहे. ‘नो व्हेईकल डे’च्या दिवशी आपले काम करण्याचे ठिकाण लांब असेल, तर पेट्रोलचा खर्च आॅटोरिक्षावर केला तर त्यांनाही सहज रोजगार प्राप्त होऊ शकतो. यामध्यमातून शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. मनुष्यालाही मोकळा श्वास घेता येईल. वायू प्रदूषणामुळे होणारे आजार टाळता येईल. अनेकांना धुळीची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. दमाचा त्रास आहे. श्वसनाचे आजार आहे. त्यांना यातून एका दिवसासाठी का होईना, हायसे वाटेल.

इंधनाची बचत व शहर निरोगी होईल
महत्त्वाचे म्हणजे, इंधनाची बचत होईल. सायकल वा पायी प्रवास केल्यास शरीराचा व्यायाम होईल आणि आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. वर्धेकरांनी नेहमीच चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांगाने विचार केल्यास ‘नो व्हेईकल डे’ केवळ वायू प्रदूषणच टाळण्यासाठी नसेल, तर आपले आणि समाजाचे सोबतच शहराचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होईल. संघटना, संस्था तसेच प्रशासनाच्या माध्यमातून चार भिंतीच्या खोलीत विविध विषयावर समाज प्रबोधन करण्यात येते. या प्रबोधनाची गरज असली तरी ते कृतीतून केल्यास त्याचा प्रचार आणि प्रसारही झपाट्याने होतो.
भविष्यातील धोका टाळण्यासाठी आताच पुढाकार हवा
चंद्रपूरकरांनी वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. वर्धेकरांसाठी भविष्यातील वायू प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. सामाजिक, संघटना व प्रशासनाने पुढाकार घेतल्यास आठवड्यातील एक दिवस वा महिन्यातील दोन दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळणे अवघड नाही. चंद्रपूर पाठोपाठ वर्धेतही ‘नो व्हेईकल’ हा ‘पर्यावरण बचाव’चा पवित्र संदेश इतर जिल्ह्यात पोहचेल आणि त्याचे अनुकरण बघता बघता सर्वत्र बघायला मिळेल, अशी वर्धेकरांचीही मनोमन इच्छा आहे. फक्त गरज आहे पहिले ओ देणाऱ्याची.

प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस जरी वाहन न चालविण्याचे ठरविल्यास केवळ प्रदूषण नियंत्रण होणार नाही तर इंधनावर होणारा खर्चही वाचेल. त्यामुळे नो व्हेईकल डे ला परिवहन विभाग पूर्ण समर्थन करीत आहे.
- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

‘नो व्हेईकल डे’ ही अतिशय स्तुत्य संकल्पना आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे जी मदत लागेल ती करण्यास आम्ही तत्पर आहोत.
- चंद्रकांत बहादुरे, वाहतूक निरीक्षक, वर्धा

‘नो व्हेईकल डे’ ही कल्पना केवळ मौज म्हणून न राहता नागरिकांनी याला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम हे शहर माझे आहे, ही भावना निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे असून बहार नेचर आणि आम्ही वर्धेकरचा याला पूर्ण पाठिंबा असणार.
- संजय इंगळे तिगावकर, आम्ही वर्धेकर

या उपक्रमापुरतीच नव्हे तर एरव्ही ही सायकल जास्तीत जास्त चालविण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नो व्हेईकल डे एक चांगले पाऊल आहे. यासाठी सर्वप्रथम लोकांनी लाज विसरणे आवश्यक झाले आहे.
- मुरलीधर बेलखोडे, निसर्ग सेवा समिती.

प्रदूषण नियंत्रणासाठी नो व्हेईकल डे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याची गरज आहे. विशेष करुन शिकवणी वर्गाला जात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक व शिक्षकांनी सायकल अनिवार्य करावी.
-आशिष गोस्वामी, प्राणीमित्र

Web Title: 'No Vehicle Day' can be easily possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.