सवारी नाही, पैसेही संपले, सांगा कुटुंब चालवू तरी कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:06+5:30
लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो.

सवारी नाही, पैसेही संपले, सांगा कुटुंब चालवू तरी कसे
पुरूषोत्तम नागपुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तीन दिवसांपासून रिक्षा उभा आहे...एकही सवारी नाही... १० रुपयेही घरी नेऊ शकत नाही...पैसेच नसल्याने पत्नी, मुलांचे शिक्षण...घर खर्च कसा चालवू...अशी व्यथा पाणावलेल्या डोळ्यांनी रिक्षाचालक मांडत आहेत.
लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो. एकही पैसा मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. सवारी अभावी सायकल रिक्षाचालकांवर आधीच अवकळा आली आहे. काही सवारी आल्याच तर ई-रिक्षावाले त्या अर्ध्या पैशात घेऊन जातात. दोन महिने उलटले परिस्थितीत जैसे थेच आहे. बससेवा बंद असल्याने एकही सवारी मिळत नाही. उद्योगधंदे ठप्प असल्याने कुठे मजुरीही मिळत नाही. सायकल रिक्षाची जागा आता ऑटोरिक्षाने घेतल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्वी शहर मोठी बाजारपेठ असल्याने ग्राहकांची व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. रिक्षाचालकांना देखील चांगला रोजगार मिळत होता. पूर्वी खेड्यापाड्यातून दही, दूध, ताक तूप घेऊन येणारे गौरी समाजाचे ग्राहक बसस्थानकावर उतरायचे व रिक्षात बसून सोडून देताना ते स्व:खुशीने २० ते ३० रुपये देत होते. पण, लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रिक्षाचालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे उदरनिर्वाह करणे झाले कठीण
शहरातील विविध भागात जाण्याकरीता रिक्षाचालक २० ते ४० रुपयांपर्यंत दर आकरत असल्याने सुमारे दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळत होते. पण, सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बसस्थानकातून शहरातील विविध ठिकाणी जाण्याकरता प्रवासी मिळत होते ते आता ई-रिक्षा व ऑटोरिक्षाचालक घेऊन जात असल्याने रिक्षाचालकांला प्रवासी मिळणे कठीण झालेले आहे.
गेल्या ४४ वर्षांपासून रिक्षाचालकांवर अशी स्थिती कधीच ओढावली नाही. लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा ही चिंता आहे. बसस्थानक परिसरातून एकही सवारी मिळत नाही. आम्ही ऊल्हापूर नाक्याचे चाळीस रुपये घेत होतो. पण, पण, त्याच सवारीला ऑटो रिक्षाचालक वीस रुपयांत घेऊन जात असल्याने नागरिकांनीही सायकलरिक्षाकडे पाठ फिरविली आहे.
शेख बसिर शेख कादीर, रिक्षाचालक