स्वच्छता अभियानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 23, 2015 01:55 IST2015-04-23T01:55:45+5:302015-04-23T01:55:45+5:30
केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते.

स्वच्छता अभियानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, पालिकेवर राकाँ-भाजप युतीची सत्ता आहे.
त्यांनी शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने केंद शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. तर राज्य शासनाने या अभियानात योगदान देताना नगर पालिकांना मार्गदर्शक सूचना केल्या. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वर्धा नगर पालिकेने शासनाच्या अभियानास व निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना दाद दिलेली दिसत नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारे यांना या संदर्भात वारंवार विचारणा केली असता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोणतीच कारवाई न.प.द्वारे करण्यात आली नाही. गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीत स्वच्छता मोहिमेचा अशा रीतीने फज्जा उडणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचा आरोप केला आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य, राहणीमान उंचावण्यास तसेच भारताची सभ्यता, संस्कृती व सुचिता जीवनात प्रभावीपणे अंगीकारणारे सदर स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात यावे, असे आदेश नगर पालिकेला द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळ अनिल धोटे, प्रकाश खंडाते, योगेश भुंबर, आशिष दोडे, अमित पांडे, दिनेश डकरे, स्वप्निल गोटे यांच्यासह आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)