सावंगी (मेघे) रुग्णालयात अवघड शस्त्रक्रियावर्धा: वैद्यकीय सेवेत हृदयाच्या व मेंदुच्या, मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रिया शल्यचिकित्सकांसाठी अजूनही आव्हान मानल्या जातात. आजच्या आधुनिक काळातही अॅनेस्थेशिया मॅनेजमेंट म्हणजेच सुंघणी व्यवस्थापन, शल्यचिकित्सेबाबत योग्य निर्णय आणि शस्त्रक्रियेनंतरची अतिदक्षता सेवा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या झाल्या आहेत. याच बाबींची योग्य सांगड घालत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मेंदुची अवघड शस्त्रक्रिया करीत एका तरुणाला जीवनदान देण्यात डॉक्टरांच्या चमूने यश मिळविले आहे.स्थानिक कारला मार्गावरील स्वागत कॉलनी येथील रहिवासी निलेश पुरूषोत्तम खंडाळकर (२८) हा जन्मत:च डब्ल्यूपीडब्ल्यू सिंड्रोमचा म्हणजेच हृदयाची अपसामान्य स्पंदनगती असलेला रुग्ण असल्याने छातीत दाटून येण्याचा त्याला त्रास होता. सन २००३ मध्ये नागपूर येथे शस्त्रक्रिया करून त्याचा हृदयाची झडप बदलण्यात आली. निलेशला २०१२ पर्यंत कोणताही त्रास नव्हता. मात्र, नंतरच्या काळात पुन्हा हृदयाची स्पंदने दुप्पट गतीने वाढत गेल्यामुळे पुन्हा नियमित वैद्यकीय उपचार सुरू झालेत. यादरम्यान संपूर्ण शरीराची तपासणी करण्याकरिता एमआरआय करण्यात आले. या तपासणीत हृदयविकारासोबतच ब्रेनट्युमरही असल्याचे दिसून आले. नागपूर येथे उपचार व शस्त्रक्रियांचा संभाव्य खर्च अत्याधिक असल्याने रुग्णपरिवाराने सावंगी मेघे रुग्णालयाकडे धाव घेतली.सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात निलेशला भरती केले असता त्याची शारीरिक अवस्था शस्त्रक्रियेयोग्य नसल्याचे न्यूरोसर्जन डॉ. संदीप इरटवार व न्यूरोअॅनेस्थेशिओलॉजिस्ट डॉ. प्रसाद इंगळे यांना दिसून आले. हृदयातील कृत्रिम झडप सुरक्षित राहावी, यासाठी देण्यात येणाऱ्या औषधीमुळे रक्त पातळ झालेले होते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा रक्तस्त्राव हा सामान्य रुग्णापेक्षा अधिक होत असल्याने तसेच हृदयाच्या अपसामान्य स्पंदनामुळे अशा रूग्णाला हाय रिस्क पेशंट मानल्या जाते. अशावेळी, पर्यायी उपचारपद्धतीचा वापर करणे गरजचे असते. ही निकड ओळखून डॉ. संदीप इरटवार, डॉ. अक्षय पाटील, डॉ. शैलेंद्र अंजनकर, डॉ. अक्षय बोरा, डॉ. शैलेंद्र पुष्पकर या मेंदुशल्यचिकित्सकांच्या चमूने डॉ. प्रसाद इंगळे, डॉ. अखिल, डॉ. विनया नायर, डॉ. ललित जाधव, डॉ. श्रीमयी श्रीनिवास, डॉ. सुजाता रावलानी या भूलतज्ज्ञांचे कौशल्य पणाला लावत शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. योग्य आणि अचुक नियोजन करीत निलेशच्या मेंदुची शस्त्रक्रिया करून टयुमर काढण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरच्या काळात अतिदक्षता विभागातील परिचारकांच्या चमूने योग्य शुश्रुषा करीत या जीवनदायी कार्याला पूर्णत्व प्राप्त करून दिले. सध्या निलेशची प्रकृती धोक्याबाहेर असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत त्याला वैद्यकीय सेवा प्राप्त झाल्याचे डॉ. इरटवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
न्यूरोसायन्सच्या चमूने केले रुग्णाला आयुष्यमान
By admin | Updated: October 5, 2016 01:43 IST