वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकाराची गरज
By Admin | Updated: July 31, 2014 00:10 IST2014-07-31T00:10:11+5:302014-07-31T00:10:11+5:30
राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाघांचे संरक्षण झाले तरच वनांचे संवर्धनही होईल. अन् जंगलांचे संर्वधन झाले तरच मनुष्यांचे संरक्षण होईल,

वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकाराची गरज
संजय भागवत : जागतिक व्याघ्र दिनाचा कार्यक्रम
वर्धा : राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाघांचे संरक्षण झाले तरच वनांचे संवर्धनही होईल. अन् जंगलांचे संर्वधन झाले तरच मनुष्यांचे संरक्षण होईल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
बोर अभयारण्यातील सभागृहात चौथ्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भागवत बोलत होते. यावेळी बोर अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम सावंत, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनर, न्यू बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपाली भिंगारे-सावंत, वर्धा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, आम्ही वर्धेकर संस्थेचे संस्थापक संजय इंगळे तिगावकर, निसर्गप्रेमी डॉ. जयंत वाघ, डॉ. प्रतापसिंह परिहार, रवींद्र पाटील, किशोर वानखडे उपस्थित होते.
वन विभागातर्फे या दिनानिमित्त परिसरातील गावातील शाळेत जाऊन ‘वाघ वाचवा’ या विषयावर निबंध स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुकही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गाडेकर यांनी केले. आभार रुपाली भिंगारे-सावंत यांनी मानले. याप्रसंगी निसर्गप्रेमींनी विचार मांडले. कार्यक्रमानंतर जंगल सफारी करून निसर्गाचा आनंद निसर्गप्रमींनी घेतला.
पॉवर पॉइंटद्वारे विस्तृत माहिती
व्याघ्र दिनाचे औचित्य साधून अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत यांनी पॉवर पॉईटच्या माध्यमातून इको-टूरिझम, वनसंवर्धन, रोजगार आणि आरोग्यविषयक माहितीसह सादरीकरण केले. यामध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून भविष्यातील वनांची स्थिती आणि उपाययोजना यावर भर दिला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोर अभयारण्याला झाले आहे. पुढील काळात पर्यटकांची पसंती बोर अभयारण्यालाच राहून निश्चितच उत्पन्नातही अधिक वाढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)