अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश
By Admin | Updated: May 20, 2016 01:53 IST2016-05-20T01:53:18+5:302016-05-20T01:53:18+5:30
अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते.

अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश
चिलवीरवार कुटुंबियांनी ठेवला आदर्श : अस्थी, रक्षा स्मशानभूमीत पुरून त्यावर वृक्षारोपण
हिंगणघाट : अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्याकरिता स्मशानभूमीतच खड्डा करून त्यात अस्थी, चितेची राख पुरून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावत येथील तहसील वॉर्डातील लेबर कॉलनीत चिलवीरवार कुटुंबियांनी निसर्ग संगोपणाचा नवीन पायंडा घालून दिला आहे.
अस्थी, चितेची राख, पूजाविधीत काढलेले डोक्यांवरील केस नदीत विसर्जन करण्याची परंपरा आहे; पण यातून नदीपात्राचे प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्याचा निर्णय चिलवीरवार कुटुंबियांनी घेतला. यातून समाजापुढे पर्यावरण रक्षणाचा एक आगळा आदर्श ठेवला गेला.
खड्ड्यात ही राख, अस्थी ठेवून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावले. या वटवृक्षाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा कठडाही चिलवीरवार कुटुंबियांनी बसविला. या झाडातून आपल्या वडिलांची आठवण जपण्याचा संकल्पही त्यांनी येथे सोडला.
येथील श्याम बळीराम चिलवीरवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वणा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आला; पण यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेहावरील निर्माल्य, कापलेले केस नदीत विसर्जित न करता स्मशानभूमीवर खड्डा करून त्यात टाकले. यानंतर अस्थी, चितेच्या राखेचे विसर्जन कुठल्याही नदीत वा तलावात न करता स्मशानभूमित एका खड्ड्यात पुरून त्यावर वडाचे रोप लावण्यात आले. यावेळी श्यामराव चिलवीरवार यांची मुले विष्णु चिलवीरवार, अनिल चिलवीरवार, उषा परकोटवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज गोल्हर आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावता यावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असे विचार चिलवीरवार कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)