वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:02+5:30

ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे.

Nagpur-Mumbai 'bullet train' to run through Wardha | वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

googlenewsNext

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाकडून नागपूर - मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प नियोजित आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे. जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारा ठिकाणी राहणार थांबे
२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या नागपूर - मुंबई या बुलेट ट्रेनचे तब्बल बारा ठिकाणी थांबे राहणार आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील केवळ २३ एकर जमीन होणार अधिग्रहित
नागपूर - मुंबई ही बुटेल ट्रेन समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार असून, त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करतानाच अर्ध्याहून अधिक जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी २३ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि.च्यावतीने पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने होणार आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प राज्य व केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर याचा राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारकडून नियोजित असून, त्याबाबतची पर्यावरण व सामाजिक विचार-विनिमयाबाबतची सभा सोमवार, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या सभेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती शासनाला पाठवली जाणार आहे.
- मनोजकुमार खैरनार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वर्धा.

२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार बुलेट ट्रेन

नागपूर ते मुंबईपर्यंतचा बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग ७५३ किलोमीटरचा राहणार आहे. या रेल्वे मार्गावर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावेल, अशा गुणवत्तेचा हा रेल्वे रुळ राहणार आहे. इतकेच नव्हे तर ही बुलेट ट्रेन २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

Web Title: Nagpur-Mumbai 'bullet train' to run through Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे