ओल्या कापसाची परस्पर विल्हेवाट

By Admin | Updated: March 20, 2015 01:46 IST2015-03-20T01:45:16+5:302015-03-20T01:46:00+5:30

जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. यात सीसीआयडून नियोजनात अनागोंदी झाल्याने देवळी येथे सुमारे १५० क्विंटल कापूस भिजला.

Mutual disposal of wet cotton | ओल्या कापसाची परस्पर विल्हेवाट

ओल्या कापसाची परस्पर विल्हेवाट

हरिदास ढोक देवळी
जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. यात सीसीआयडून नियोजनात अनागोंदी झाल्याने देवळी येथे सुमारे १५० क्विंटल कापूस भिजला. या ओल्या झालेल्या कापसाची कुठेही वाच्यता न करता स्थानिक कर्मचाऱ्यांनी विल्हेवाट लावल्याचे गुरुवारी उघड झाले. नैसर्गिक व इतर कारणामुळे कापूस बेकार झाल्यास एकूण खरेदीच्या तीन टक्क्यापर्यंत सूट देण्याचे सीसीआयचे धोरण आहे. याच सवलतीचा गैरफायदा घेऊन कापसाची कृत्रिम तूट दाखविली जात असल्याचे चित्र देवळी सीसीआय रंगवित आहे.
भारतीय कापूस निगम (सीसीआय)च्या तुघलकी कारभारामुळे या परिसरातील कापूस उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहे. कालपर्यंत प्रति क्विंटल ४ हजार ५० रुपयांपर्यंत असलेले कापसाचे दर १०० रुपयांनी पाडून ३ हजार ९२५ रुपयांत खरेदी होत आहे. त्याचप्रमाणे गंजीवर गाडी खाली करीत असताना अनेक नखऱ्यांचा थयथयाट करून क्विंटल मागे १०० ते २०० रुपयांपर्यंत मार दिला जात आहे. कमी स्टेपलचे कारण काढत मनमानी करण्यात येत आहे. दर वाढण्याच्या अपेक्षेमुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरीच आहे. भाव न पाडता अखरेच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी करण्याच्या सीसीआयच्या धोरणाला येथे मुठमाती दिली जात आहे.
देवळीत सीसीआयचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. १६ फेबु्रवारी ते १८ मार्च या कालावधित केवळ दोनच दिवस कापूस खरेदी झाली. २० ते ३१ मार्चपर्यंत पुन्हा खरेदी बंद करण्यात आली. या वर्षाच्या कापूस हंगामात एकूण १५० दिवसांपैकी केवळ ६५ दिवसच सीसीआयची खरेदी झाली. त्यामुळे दरवर्षी या बाजार समितींतर्गत असलेली साडेतीन लाख क्विंटलपर्यंती खरेदी २ लाख ४५ हजारांवर गुंडाळण्यात आली. सीसीआयचे महाप्रबंधक यु.के. सिंह व येथील ग्रेडर पन्नालाल सिंह यांच्या लहरी धोरणामुळे या परिसरातील हजारो क्विंटल कापूस बाहेरगावी विकण्यात आला.
कास्तकारांच्या आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वपूर्ण असतो. कर्जाची परतफेड व इतर व्यवहार त्यांना करावयाचे असते. अश्यावेळेस खरेदी बंद करण्यामागे, खाजगी व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Mutual disposal of wet cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.