वर्धा व वायफड येथे हत्या

By Admin | Updated: August 4, 2015 02:07 IST2015-08-04T02:07:06+5:302015-08-04T02:07:06+5:30

जिल्ह्यात रविवार हा ‘हत्या’वार ठरला. वर्धेतील साईनगर परिसरात अजयसिंह नरेंद्रसिंह ठाकूर (२८) रा. शांतीनगर याची जुन्या

Murder at Wardha and Wifead | वर्धा व वायफड येथे हत्या

वर्धा व वायफड येथे हत्या

जिल्ह्यात रविवार हा ‘हत्या’वार ठरला. वर्धेतील साईनगर परिसरात अजयसिंह नरेंद्रसिंह ठाकूर (२८) रा. शांतीनगर याची जुन्या वैमनस्यातून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या सहकाऱ्यांचा पत्ता लागला असून त्यांना सोमवारी रात्रीपर्यंत अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वायफड येथे बैलाच्या कारणावरून दोघा भावात वाद झाला. यात रविंद्र कावनकुरे हा जागीच ठार झाला. तर युवराज शंकर कावनकुरे व त्याचा भाऊ महेंद्र कावनकुरे हे दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

जुन्या वैमनस्यातून युवकाची हत्या
वर्धा : जुन्या वैमनस्यातून एकाची हत्या केल्याची घटना येथील साईनगर परिसरात रविवारी रात्री घडली. मृतकाचे नाव अजयसिंह ठाकूर रा. शांती नगर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव पंकज उर्फ विक्की शंकरप्रसाद चौबे (२८) रा. परदेशीपुरा, रामनगर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रामनगर परिसरातील साईनगर येथे एका युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. यावरून शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. त्याची ओळख पटविली असता त्याचे नाव अजयसिंह ठाकूर असल्याचे समोर आले.
अजयवर हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत एक युवक असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या युवकाना ताब्यात घेत विचारणा केली. यानंतर सर्व प्रकार उघड झाला. विजय याचा विक्की चौबे याच्या भावासोबत असलेल्या जुन्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी घटनेच्या रात्री पंकज उर्फ विक्की शंकरप्रसाद चौबे याला त्याच्या घरून अटक केली. त्याला पोलिसी हिसका दाखविला असता त्याने त्याच्या सहकाऱ्यांची नावे सांगितली असून त्यांना अद्याप अटक होणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या हत्या प्रकरणातील आणखी पाचही आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांना वृत्त लिहिस्तोवर अटक करण्याची कारवाई सुरू असल्याने पोलिसांनी नावे सांगण्यास नकार दिला. ही कारवाई ठाणेदार एम. बुराडे, विजय मगर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे ज्ञानेश्वर निशाणे, गजानन गहुकर, आकाश चुंगडे, धमेंद्र अकाली, विशाल बंगाले, प्रमोद जांभूळकर, गजानन काठणे, मणोहर मुडे, सचीन वाटखेडे, संजय राठत्तेड व चार्ली पथकाचे अनिल वर्मा यांनी केली.(प्रतिनिधी)

मृतकावरही अनेक गुन्हे
४या हत्या प्रकरणातील मृतक अजयसिंह याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याने गत काही दिवसांपूवी येथील मिनाबाजारात एकावर चाकूहल्ला केला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल होता.

मृतकाच्या शरीरावर २१ जखमा
४मृतक अजयसिंह याच्या अंगावर चाकूच्या एकूण २१ जखमा आहेत. १५ जखमा त्याच्या पाठीवर, चार जखमा डोक्यावर तर उर्वरीत जखमा शरीरावर इतर ठिकाणी आहेत.

शेतीच्या कारणावरून हत्या
वर्धा : शेतात बैल बुजाडल्याने उद्भवलेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. ही घटना पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत वायफड येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यात रवींद्र कावनकुरे याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ युवराज शंकर कावनकुरे (२८), महेंद्र कावनकूरे हे दोघे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हत्या प्रकरणी सहा जणांवर सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराजच्या मालकीचे बैल त्याने शेतात नेले होते. हे बैल बुजाडल्याने नामदेव कावनकूरे यांच्या शेतात गेले. यावरुन नामदेव व युवराज या दोघात वाद झाला. हा वाद समोपचाराने मिटविण्यात आला. असे असताना नामदेवने याबाबत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वादाची तक्रार का दिली अशी विचारणा करण्यासाठी युवराज गेला असता नामदेवने त्याचा भाऊ सुरेश कावनकुरे, अशोक कावनकुरे, प्रदीप कावनकुरे, संजय कावनकुरे, दिलीप कावनकुरे यांच्या मदतीने युवराजवर हल्ला केला. यावेळी युवराजचा भाऊ महेंद्र कावनकूरे व रवींद्र कावनकुरे मध्यस्थी करण्याकरिता गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या तिघांवर लाठी, काठी, कुऱ्हाडीने, विळ्याने हल्ला करण्यात आला. यात रवींद्रच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
याबाबत युवराजने सेवाग्राम पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन सदर सहाही हल्लेखोरांवर कलम ३०२, ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Murder at Wardha and Wifead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.