वीज बिलाची थकबाकी भोवली! जिल्ह्यातील २५ उद्योगांवर महावितरणची टाच; केली बत्ती गूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 17:07 IST2022-02-23T16:51:43+5:302022-02-23T17:07:56+5:30
जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

वीज बिलाची थकबाकी भोवली! जिल्ह्यातील २५ उद्योगांवर महावितरणची टाच; केली बत्ती गूल!
वर्धा : कोविडचा जोर ओसरताच महावितरणकडून थकबाकी वसुलीच्या मोहिमेला गती दिली जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून वारंवार माहिती देऊनही थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्युत देयक माफ करण्याचा कुठलाही निर्णय शासनाकडून घेण्यात आला नाही. पण नवीन विद्युत धोरणानुसार थकबाकीदारांना काही सवलती देण्यात आल्या; पण या सवलतीची माहिती देत वारंवार विद्युत देयक अदा करण्यासाठी सांगूनही थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांवर आता महावितरणने धडक कारवाईच करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी न भरल्याचा ठपका ठेवून जानेवारी महिन्यात १७, तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत आठ औद्योगिक ग्राहकांचा विद्युत पुरवठाच खंडित करण्यात आला आहे.
२.५५ कोटींची झाली वसुली
धडक थकबाकी वसुली मोहिमेच्या माध्यमातून महावितरणने आतापर्यंत औद्योगिक ग्राहकांकडून विद्युत देयकापोटीची २.५५ कोटींची थकबाकी वसूल केली आहे. ही थकबाकी वसुली मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
३.१३ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी होताहेत प्रयत्न
जिल्ह्यात एकूण ४ हजार ४६९ औद्योगिक ग्राहक आहेत; पण या औद्योगिक ग्राहकांकडे अजूनही ३.१३ कोटींची विद्युत देयकापोटीची थकबाकी आहे. हीच थकबाकीची रक्कम वेळीच महावितरणला मिळावी या हेतूने जिल्ह्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून विशेष प्रयत्न होत आहेत.
एकूण औद्योगिक ग्राहक : ४,४६९
थकबाकी : ३.१३ कोटी
वसुली : २.५५ कोटी
बत्ती गूलची स्थिती
जानेवारी : १७
फेब्रुवारी : ०८
थकबाकीदारांना नवीन विद्युत धोरणात काही सवलती देण्यात आल्या आहेत. याचा लाभ घेत थकबाकीदारांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीची रक्कम वेळीच भरून महावितरणला सहकार्य करावे.
- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.