सीईओंवर अविश्वास आणण्यासाठी हालचाली
By Admin | Updated: August 22, 2015 02:06 IST2015-08-22T02:06:30+5:302015-08-22T02:06:30+5:30
एका सभापतीकडून सदस्यांना साकडे : जि.प. शिक्षण विभाग चांगलाच गोत्यात

सीईओंवर अविश्वास आणण्यासाठी हालचाली
राजेश भोजेकर वर्धा
सध्या गाजत असलेला कथित शिक्षक बदली घोटाळा आणि त्यातच विषयतज्ज्ञ भरती प्रक्रियेत गुणपत्रिका बदलविल्याप्रकरणी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यासह एका गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे. सदर प्रकरण आपल्याही अंगलट येऊ शकते, या भीतीने एका सभापतीने सीईओंवर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती असून याला काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोराही दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर घेतलेल्या ठरावाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देत तब्बल ३९ शिक्षकांच्या बदल्या करुन टाकल्या. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच एकच कल्लोळ उडाला. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी नियमावर बोट ठेवून एका गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित केले. तसेच अन्य पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. यासोबतच शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांच्यासह एका गटशिक्षणाधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. यामुळे शिक्षण विभाग गोत्यात आला आहे. हे प्रकरण गाजत असतानाच जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील आणखी एक गंभीर प्रकरण उजेडात आले. हा प्रकार पोलीस ठाण्यातही पोहोचला. यामुळे सर्वत्र विविध चर्चेला उधाण आले आहे.
एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीईओला येथेच रोखण्यासाठी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागेल. यासाठी आपण काही सदस्य एकत्र येऊ, असे ते सभापती म्हणाले. याबाबत काही अन्य सदस्यांशीही चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली, अशी माहिती सदर सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. याबाबत त्या सदस्याने सदर सभापतीचे नाव छापू नका, असा आग्रहही धरला.