विसर्जनकुंड तयार करण्यास चालढकल
By Admin | Updated: August 1, 2015 02:34 IST2015-08-01T02:34:11+5:302015-08-01T02:34:11+5:30
धाम नदी तिरावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने मूर्तींचे विसर्जन होत असते.

विसर्जनकुंड तयार करण्यास चालढकल
पवनार : धाम नदी तिरावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने मूर्तींचे विसर्जन होत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूर्त्यांचे विसर्जन पर्यावरणपूरक होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील पात्र दूषित होऊ नये यासाठी विसर्जनकुंड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकदे सादर केला. पालकमंत्री पवनार भेटीला आले असता तसे आदेशही जिल्हाधिकारी यांना दिले. परंतु गणेशोत्सव जवळ येऊनही विसर्जनकुंड निर्माण करण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत अडकल्याचे दिसते.
नदीमध्ये मूर्ती व निर्माल्याचे विर्सजन होत असल्यामुळे धाम नदी प्रदूषित होत आहे. किमान निर्माल्य व लहान गणपतीचे विसर्जन नदीपात्रात होऊ यासाठी ग्रा.पं. पवनार ने गरवर्षी पुढाकार घेतला होता. त्याकरिता नदीकिनारी प्लास्टिकचे कुंड ठेऊन त्यात भाविकांनी मूर्तीविसर्जन करण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा ठेवण्यात आले होते. या कारणाने जवळपास १७ ट्रॉली निर्माल्य नदीत न जाता त्याचे खतही तयार करण्यात आले. मात्र मोठ्या मूर्तींचे विसर्जन नदी पात्रातच झाले.
मोठ्याही मूर्तींचे विसर्जन नदी पात्रात न करता त्याचे विसर्जनही पर्यावरणपुरक होण्यासाठी कायमस्वरूपी कुंडाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पवनार ग्रा. पं. ने शासनाकडे सादर केला. १४ जानेवारी २०१५ ला नदी साफसफाई मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या हस्ते झाला असता त्यांनाही विसर्जन कुंडाविषयी निवेदन देण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी स्वत: जागेची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना तात्काळ कुंड निर्मितीसाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही दिले. जिल्हाधिकारी यांनी १९ जाने २०१५ ला जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. परंतु जि.प. बांधकाम विभागाने पर्यावरण पुरक विसर्जन कुंड हा नदीलगत येत असल्यामुळे ही बाब पाटबंधारे विभागाकडे ढकलली. पाटबंधारे विभागाने घाट बांधणे हे आमचे काम नसून ही बाब बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याचा अहवाल जि. प. बांधकाम विभागाकडे पाठविला. त्यामुळे कुंड निर्मितीसाठी अंदाजित असलेला ७० लाखांचा निधी कसा उपलब्ध करावा, हा प्रश्न बांधकाम विभागाला पडला आहे.
या ही वर्षी नदी पात्रात मूर्ती विर्सजन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होईल व नदी पात्रही दूषित होईल. तसेच यातील प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती या पाण्यात विरघळत नाही. मूर्त्यांचे अवशेष महिनोंमहिने तसेच शिल्लक राहतात.
मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च हा ग्रा.पं. च्या आवाक्याबाहेरचा आहे. प्रस्तावित विसर्जन कूंडाची जागा ही ग्रा.पं.च्या अखत्यारित आहे. निधीची उपलब्धता झाल्यास सहजगत्या कूंड तयार होऊ शकतो. परंतु लालफितशाही अडकलेल्या या प्रस्तावाला केव्हा मंजुरी मिळेल कोदेच आहे. यावर्षी जि.प. प्रशासनाने ग्रा.पं. ला तसेच आदेश दिल्यास त्याकरिता लागणाऱ्या खर्चाची व्यवस्थासुद्धा जि.प. ने करावी, अशी विनंती येथील सरपंच अजय गांडोळे यांनी केली आहे.(वार्ताहर)