माँ-बाबांच्या मुलीने नई तालिमच्या स्मृतींना दिला उजाळा
By Admin | Updated: November 17, 2016 00:47 IST2016-11-17T00:47:59+5:302016-11-17T00:47:59+5:30
हिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीम समिती आणि आनंद निकेतन याची जडणघडण मॉ-बाबांच्या प्रयत्नातून झाली.

माँ-बाबांच्या मुलीने नई तालिमच्या स्मृतींना दिला उजाळा
मुलाखत : आशादेवी व इ.डब्लू. आर्यनायकम यांची कन्या मिता घोष यांची सेवाग्राम आश्रमला भेट
दिलीप चव्हाण सेवाग्राम
हिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीम समिती आणि आनंद निकेतन याची जडणघडण मॉ-बाबांच्या प्रयत्नातून झाली. मॉ-बाबा पुरस्काराच्या माध्यमातून २९ वर्षानंतर सेवाग्राम आश्रमला भेट देण्याचा योग आला. आनंद निकेतनच्या संस्काराची शिदोरी जीवनभर सोबत राहील. सध्या अमेरिकेत राहत असली तरी आनंद निकेतनची विद्यार्थिनी असल्याचे सांगताना अभिमान वाटतो, असे मिता घोष यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मॉ-बाबा म्हणजेच नई तालीमचे शिल्पकार आशादेवी व इ.डब्लू. आर्यनायकम यांची कन्या मिता घोष या पुरस्काराच्या वितरणाकरिता सेवाग्राम येथे आल्या. आश्रम परिसराला भेट दिल्यावर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्मृतींना उजाळा दिला.
मिताताई यांचे बालपण नई तालीम परिसरात गेले. महात्मा गांधी यांचा सहवास त्यांना लाभला. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना देशातील मोठ-मोठी नेतेमंडळी आश्रमात येत होते. बापूजींकडे नेहमी येणे-जाणे असल्याने मी दारात उभी दिसले की बापू हसून आत बोलवायचे. तीन बंदर दाखवून एखादी गोष्ट सांगायचे. स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त बापंूकडे लहान मुलांसाठी वेळ राहत होता. त्यांना भेटण्यात विशेष आनंद होता. पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजनी नायडू, राजेंद्रप्रसाद यांना जवळून पाहिले. त्यांच्याकडून बरेच शिकता आले, असे त्यांनी सांगितले.
नई तालीम कुटीतील त्यांचे घर आणि येथे लावलेले मॉ-बाबाचे छायाचित्र न्याहाळताना त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. १९३७ मध्ये हिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीमची शाळा माँ बाबा यांच्या देखरेखीखाली सुरू झाली. विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी हा परिसर सदैव भरलेला असत. नई तालीम आणि आश्रम हा एक परिवार वाटायचा. येथे सर्व जाती व धर्माचे विद्यार्थी शिकतात. माझ्या आई वडिलांना ते माँ बाबा असेच म्हणायचे. त्यामुळे कुटुंब ही संकल्पना आम्हाला माहिती नव्हती आमचा परिवार होता, हेच संस्कार आयुष्यभराची शिदोरी ठरले.
अमेरिकेत सुरू केली बालवाडी
येथे पहाटेपासून सुरू होणारी दिनचर्या सायंकाळी प्रार्थना व अभ्यासानंतर समाप्त होत असे. स्वच्छता, बागवानी, सुतकताई, बुनाई, स्वयंपाक, गोशाळा अशी सर्व प्रकारची कामे विद्यार्थी दशेत केलीत. लग्न झाल्यानंतर पतीसोबत जर्मनी व अमेरिका येथे गेले. अमेरिकेतील डिट्राईट येथे नई तालीमच्या संस्कारावर आधारीत बालवाडी सुरू केली. ३५ वर्षे शिक्षिकेचे काम केले.
८२ वर्षांच्या असलेल्या मिता घोष यांच्या सेवाग्राम आश्रम येथील आगमनाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी त्यांनी आप्तांच्या आवर्जून भेटी घेतल्या. आश्रमात आमचा परिवार आहे, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.