कार अपघातात आई ठार, मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:51 IST2017-08-09T17:49:17+5:302017-08-09T17:51:49+5:30
मुलीला नागपूर येथे फार्मसी महाविद्यालयात पोहोचवून परतीच्या प्रवासावर असलेल्या येथील आॅप्टीकल व्यावसायिकाच्या कारला वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला.

कार अपघातात आई ठार, मुलगा जखमी
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : मुलीला नागपूर येथे फार्मसी महाविद्यालयात पोहोचवून परतीच्या प्रवासावर असलेल्या येथील आॅप्टीकल व्यावसायिकाच्या कारला वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. यात आई ठार तर मुलगा जखमी झाला. या भीषण अपघातात कारची एअर बॅग वेळेवर उघडल्याने मुलगा वाचला.
निता महेश शर्मा (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर राहुल महेश शर्मा (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध महेश आॅप्टीकलचे संचालक महेश शर्मा यांची मुलगी रोशनी हिचा नागपूरच्या फार्मसी महाविद्यालयात प्रवेश झाला होता. बुधवारपासून महाविद्यालय सुरू होणार असल्याने शर्मा परिवार तिला सोडण्यासाठी मंगळवारी दुपारी नागपूर येथे गेला होता. रोशनीला नागपुरात सोडून परतीच्या प्रवासात असताना वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजता कार अचानक एका पुलावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, पुलाचे कठडे तोडून कार पुन्हा नागपूरच्या दिशेने वळली. या अपघातात निता शर्मा आणि त्यांचा मुलगा राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रात्री ११.३० वाजता निता शर्मा यांना मृत घोषित केले. तर राहुलच्या डोक्याला दुखापत झाली. विशेष म्हणजे कारमधील एअर बलून वेळेवर उघडल्याने राहुल सुदैवाने वाचला.
वर्धा येथे शवविच्छेदन झाल्यानंतर नीता शर्मा यांचा मृतदेह यवतमाळात आणण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवळी (जि. वर्धा) पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.