मृतांत वयाची साठी ओलांडलेले अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:02+5:30
जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे.

मृतांत वयाची साठी ओलांडलेले अधिक
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनामुळे शनिवारपर्यंत जिल्ह्यातील १६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात वयाची साठी ओलांडलेल्यांचाच सर्वाधिक समावेश आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे वयाचे अर्धशतक पूर्ण केलेल्यांनी सध्याच्या कोरोना काळात अधिक सतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे.
जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे. तर १ हजार ९४० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
सावधान; तरुणांना कोविड घेतोय कवेत
जिल्ह्यातील कोविड बाधितांची गुरूवार ८ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीवरून आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ० ते १० वयोगटातील ३.४६ टक्के व्यक्तींना, ११ ते २० वयोगटातील ७.३० टक्के व्यक्तींना, २१ ते ३० वयोगटातील २०.९२ टक्के व्यक्तींना, ३१ ते ४० वयोगटातील १८.८८ टक्के व्यक्तींना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२५ टक्के व्यक्तींना, ५१ ते ६० वयोगटातील १६.२९ टक्के व्यक्तींना, ६१ ते ७० वयोगटातील ९.८१ टक्के व्यक्तींना, ७१ ते ८० वयोगटातील ४.१७ टक्के व्यक्तींना, ८१ ते ९० वयोगटातील ०.७४ टक्के व्यक्तींना, ९१ ते १०० वयोगटातील ०.०३ टक्के व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यात सर्वाधिक कोविड बाधित तरुण असल्याने जिल्ह्यातील तरुणांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
दुपटीचा दर २८ दिवसांवर
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यावेळी जिल्ह्याच्या कोरोना दुपटीचा दर १० दिवसांवर पोहोचला होता. तर सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा पर २८ दिवसांवर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आतपर्यंत जिल्ह्यात १६१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृताकांमध्ये वयाची साठी पार केलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वृद्धांनी सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अधिक दक्षता बागळली पाहिजे. शिवाय नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
जिल्ह्याचा रिकव्हरी दर उत्तम
दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी मोठ्या संख्येने वर्ध्यातील कोविडबाधित कोरोनावर मात करीत आहेत. सध्या जिल्ह्याचा कोविडमुक्तीचा दर ७० टक्के असून हा दिलासादायक आहे.