महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:11+5:30

जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे.

Moderate and free grain support in times of inflation | महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या महामारीनंतर आता नागरिकांना महागाईची मार सहन करावा लागत आहे. धान्यासोबतच, जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा भडका उडाल्याने दैनंदिन जीवनाचे अर्थचक्रच कोलमडले आहे. अशा परिस्थिती शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे मिळणाऱ्या माफक दरातील आणि मोफत धान्याचा मोठा आधार मिळत आहे.
जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. लाभार्थी अतिरिक्त धान्याची विक्री करून इतर धान्य किंवा वस्तू विकत घेत असल्याचे गावापासून तर शहरापर्यंतचे चित्र आहे. शासनाकडून मिळणारे गहू, तांदूळ आणि साखरेची किंमत  खुल्या बाजारात दुप्पट ते चौपट असल्याने या महागाईत कधी धान्याची उचल न करणारेही नियमित उचल करायला लागल्याचे चित्र आहे. 

नोव्हेंबरपर्यंत मोफत धांन्य योजनेचा लाभ
कोरोनाकाळात रोजगार हिरावल्याने धान्य कोंडी होऊन उपासमारीचा सामना करावा लागू नयेत, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफत धान्य देण्याला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाच किलो तांदूळ दिले जायचे. त्यानंतर तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ द्यायला सुरुवात केली. अजूनही हे माफत धान्य वितरण सुरूच असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा वाटप राहणार आहे. या योजनेतून जिल्ह्याकरिता दरमहा ५ हजार ४७२ मेट्रिक टन धान्य उपलब्ध होत आहे. यामध्ये ३ हजार २५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार २३२ मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण २ लाख ७९ हजार ९७४ कार्डधारक असून लाभार्थ्यांची संख्या ११ लाख ३१ हजार ९६५ आहेत. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे नियमित धान्य पुरवठा केला जातो. याकरिता दरमहा ६ हजार ५०८ मेट्रिक टन धान्य लागते. सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून ५ हजार ५८२ मेट्रिक टन धान्य दिले जाते. ऑगस्ट महिन्याचे आजपर्यंत ८० टक्के धान्य वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही धान्य वाटप सुरु असून त्यांनी दुकानातून धान्याची उचल करावी. 
- रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

 

Web Title: Moderate and free grain support in times of inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.