लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक व सामरिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या पुलगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदार राजेश बकाणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन पुलगाव समृद्धी विकास आराखडा अंतर्गत १०० कोटी रुपये निधीची मागणी निवेदन देऊन केली.
पुलगाव शहरास भारतातील प्रमुख रेल्वे मार्ग व मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची जोड मिळालेली असून, आशिया खंडातील सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडार याच शहरात स्थित आहे. तसेच शहरासमोरील वर्धा नदी व अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरून जाणारा समृद्धी महामार्ग ही येथील भूगोलाला विकासाची सुवर्णसंधी निर्माण करून देत आहे. या भागात सुमारे ४ हजार सैनिक कुटुंबीयांचा रहिवास, ३७हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक वास्तव्य यामुळे पुलगाव शहरास विशेष ओळख प्राप्त झाली आहे. याशिवाय संलग्न असलेली नाचणगाव ही राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, या परिसरात नागरी सुविधा, औद्योगिक वाढ आणि वाहतूकीसाठी विशेष आराखड्याची गरज व्यक्त केली.
कार्यवाही करण्याचे दिले आश्वासनगेल्या २५ वर्षांत महायुतीचा आमदार नसल्यामुळे विकास कामांचा मोठा अनुशेष राहिल्याचे त्यांनी नमूद केले. पुलगाव शहराच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी पुलगाव समृद्धी विकास आराखडा राबवून १०० कोटींच्या नावीन्यपूर्ण निधीची तरतूद करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलगावच्या विकासासंदर्भातील मागणीची दखल घेतली असून, लवकरच तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाहीचे आश्वासन दिले.