अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाच्या याद्या गहाळ
By Admin | Updated: February 9, 2015 23:17 IST2015-02-09T23:17:34+5:302015-02-09T23:17:34+5:30
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाच्या याद्या गहाळ
आष्टी (श़) : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़ यामुळे महसूल यंत्रणा याद्या करण्यात व्यस्त झाली. या याद्या बँकांना पाठविल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात मात्र बँकांमध्ये याद्या पोहोचल्याच नसल्याचे बँक अधिकारी बोलत आहे़ यामुळे याद्या गहाळ झाल्या वा त्या तयारच झाल्या नाही, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आष्टी तालुक्यात २६ हजार शेतकरी हे एक हेक्टरवरील तर ९ हजार ३०० शेतकरी अल्पभूधारक आहेत. गतवर्षी कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी निराश झाले़ याच नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ या नुकसानीची दखल घेत शासनाने सरसकट मदत वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. प्रारंभी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ केंद्राकडूनही मदत मागण्यात आली़ महसूल यंत्रणेला त्वरित मदत वाटपाचे निर्देश देण्यात आले; पण मदत वाटप अद्यापही झालेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ थोडीफार मदत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण ती फोलच ठरत आहे़
अतिवृष्टीच्या मदत वाटपात शासनानेच घोळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. अनेक तलाठ्यांनी गतवर्षीच्या जुन्याच याद्या पाठविल्याने खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते़ ज्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण यातही गौडबंगाल होत असलयचेच दिसून येत आहे़ यामुळे शासनाने निधी वाटपाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.(प्रतिनिधी)