मेहेरच्या परिस्थितीमुळे माणुसकी गहिवरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:25 IST2019-07-13T22:24:50+5:302019-07-13T22:25:42+5:30
येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

मेहेरच्या परिस्थितीमुळे माणुसकी गहिवरली
देवकांत चिचाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. जवळ असणारा संपूर्ण पैसाही खर्च झाला. दरम्यान भाड्याने राहत्या घरालाही पैशाअभावी मुकावे लागले. यातच आर्थिक स्थिती ढासळली व कुटुंबाचे छत गेले.
तीन मुली त्यांचे शिक्षण, पत्नी, यांचे पालनपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा स्थितीत गावातील काही नागरिकांनी मदतीचा हात दिला. टिनपत्रे, बासे तसेच बांधकाम साहित्य वापरून निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. तसेच काहींनी धान्याची व्यवस्था करून दिली. शैलेश वैद्य यांनी मुलींच्या शिकवणीची व्यवस्था केली. लेक वाचवा, लेक जगवा हे अभियान देशात सुरू आहे. या कुटुंबातील मुली हुशार असूनही परिस्थितीपुढे नतमस्तक झाल्या आहेत. गावातील मंडळीप्रमाणे सामाजिक संस्था व इतर नागरिकांनी हातभार लावला तर मेहेरे कुटुंबाचाही विकास होईल व सामाजिक बांधीलकी जोपासली जाईल. या परिवाराला समाजातील दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.