हात उंचावत मेघे समर्थक भाजपात
By Admin | Updated: July 5, 2014 23:42 IST2014-07-05T23:42:50+5:302014-07-05T23:42:50+5:30
जिल्हा भाजपाच्यावतीने सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात माजी खासदार दत्ता मेघे यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सभामंडपात विदर्भातील

हात उंचावत मेघे समर्थक भाजपात
प्रवेश मेळावा : विदर्भातील भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार
वर्धा : जिल्हा भाजपाच्यावतीने सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात माजी खासदार दत्ता मेघे यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सभामंडपात विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या जागेवर उभे राहुन हात उंचावत मेघे यांच्या आवाहनाला ओ देत काँग्रेस प्रवेश घेतला. यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मेघे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा केली.
या मेळाव्याचे औचित्य साधून विदर्भातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दत्ता मेघे यांनी याप्रसंगी सत्कार केला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी विराजमान होते. व्यासपीठावर विदर्भातून आलेली मान्यवर मंडळी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर मेळाव्यासाठी क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुमारे १५ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी तीन वॉटर प्रूफ डोम उभारण्यात आले होते. हा सभामंडप कार्यकर्त्यांनी खचाखच भरला होता. इतकेच नव्हे, तर अनेकांना उभे राहुन कार्यक्रम बघावा लागला. दुपारपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी सभास्थळी जमू लागली. मैदानाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी सावंगी परिसरातील सर्व रस्ते ओसंडून वाहत असल्यामुळे या ठिकाणी आलेल्या लोकांना मार्ग काढणे कठीण झाले होते. काल-परवापर्यंत प्रवेश मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेले जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यक्रमाची सुत्रे हलविताना दिसले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्याचे संचालन जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे व मिलिंद भेंडे, तर आभार सागर मेघे यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)