विवाहितेचा आरमोरीत संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: July 9, 2016 02:19 IST2016-07-09T02:19:56+5:302016-07-09T02:19:56+5:30
येथील जवाहर कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापक रामसिंग राठोड यांच्या मुलाचे लग्न एक वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील ...

विवाहितेचा आरमोरीत संशयास्पद मृत्यू
तणावपूर्ण वातावरणात पुलगावात अंत्यसंस्कार
पुलगाव : येथील जवाहर कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापक रामसिंग राठोड यांच्या मुलाचे लग्न एक वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील मोहन चव्हाण यांच्या मुलीशी झाले होते. मुलगा निलेश व स्रुषा जान्हवी हे नोकरीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे राहत होते. अशातच ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला; परंतु आपल्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांने तर प्रा. राठोड यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे. प्रकरणासंदर्भात शहरात विविध चर्चा सुरू असतानाच गुरुवारी रात्री १.३० वाजता तणावपूर्ण वातावरणात स्थानिक स्मशानभूमीवर जान्हवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
जवाहर कॉलनी येथील प्रा. राठोड यांचा मोठा मुलगा निलेश हा आरमोरी येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचा एक वर्षांपूर्वी दारव्हा येथील मोहन चव्हाण यांच्या मुलीशी विवाह झाला. दोघेही आरमोरी येथे वास्तव्यास होते. लहान मुलगा अक्षय हा अभियांत्रिंक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ६ जुलैच्या सायंकाळी जान्हवीचा मृत्यू झाल्याची सूचना जान्हवीच्या वडिलांना मिळाली. नंतर त्यांनी १०-१२ नातलगासह आरमोरी गाठले. तेथील परिस्थिती पाहून त्यांच्या दुखा:चा उद्रेक होऊन त्यांनी तिथे उपस्थित असलेले मुलीचे सासरे, जावई निलेश यांच्याशी वाद केला. तर मोहन चव्हाण यांनी मुलीच्या मृत्यूवर आक्षेप घेत परस्पराविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. मृतकाचे शवविच्छेदन आरमोरी येथे करण्यात आले. जान्हवीच्या वडिलांनी हरकत घेतल्यामुळे शवविच्छेदन गुरुवारी गडचिरोली येथे करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक जान्हवीचे शव माहेरच्या मंडळीसह प्रा. राठोड यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी सासरच्या मंडळीवर आरोप प्रत्यारोपामुळे काही काळ जणाव निर्माण झाला होता. परंतु काहींच्या मध्यस्थीमुळे रात्री स्थानिक पंचधारा स्मशानभूमीत मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे अनधिकृत वृत्त आहे. या प्रकरणी आरमोरी पोलीस तपास करीत असून मृत्यूचे कारण कळू शकले नाही.(तालुका प्रतिनिधी)